होमपेज › Ahamadnagar › चिमुकल्यांचे पावसासाठी साकडे

चिमुकल्यांचे पावसासाठी साकडे

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 10:14PMपुणतांबा : वार्ताहर

आषाढी एकादशीनिमित्त येथील लिटल एंजल्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी बाल वारकर्‍यांच्या वेशात गावातून दिंडी काढून सामाजिक संदेशाबरोबरच योगीराज चांगदेव महाराजांना चांगल्या पावसासाठी साकडे घातले.

अप्पासाहेब धनवटे मेमोरियल ट्रस्ट संचलित लिटल एंजल्स स्कूलच्या 300 विद्यार्थ्यांनी वारकरी वस्त्रे परिधान करून अष्टगंध, भगव्या पताका, टाळ-मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करून स्टेशन रस्त्यावरून दिंडी काढून बाजारपेठ, मुख्य रस्ता, भक्‍ती रसाने चिंब करून टाकले. अतिशय शिस्तबद्ध दिंडीने बाजारपेठेत रिंगण करून अश्‍वाने फेरी मारून अनेकांना पंढरपूरला जाणार्‍या दिंड्यांची आठवण करून दिली.

दिंडीतील विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्षारोपण ही काळाची गरज, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, प्‍लास्टिक बंदी, गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करण्याचा संदेश देऊन सर्वत्र ‘चांगला पाऊस पडू दे’, ‘दुष्काळी परिस्थिती दूर होऊ दे,’ अशी प्रार्थना विठ्ठल-रूख्मिणीसह, चांगदेव महाराजांना केली. सरपंच डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे आदींनी दिंडीचे स्वागत करून प्राचार्य बोधक यांना वृक्षभेट दिले. यावेळी राहुल धनवटे, वैजयंती धनवटे, शिक्षक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.