Sun, May 26, 2019 13:32होमपेज › Ahamadnagar › सत्ताधार्‍यांकडून आरोपींना मिळते बळ : दिलीप वळसे पाटील 

सत्ताधार्‍यांकडून आरोपींना मिळते बळ : दिलीप वळसे पाटील 

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:21PMजामखेडः प्रतिनिधी

जामखेड येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना सत्ताधार्‍यांकडून बळ मिळत आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून एसआयटी मार्फत करण्यात यावा. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात अशा घटना घडणे दुदैवी असून, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील यांनी  केली. राळेभात कुटुंबीयाला भेट देवून त्यांचे सांत्वन केले.यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गंभीर आरोप केले. 

जामखेड येथील राष्ट्रवादी काँगे्रसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची दि. 28 रोजी बीड रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राळेभात कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आ. दिलीप वळसे पाटील यांनी काल भेट देऊन  कुटुंबियांचे सांत्वन केले. 

आ.वळसे म्हणाले, संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभी राहणार आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही कुटुंबातील एका व्यक्‍तीला आमच्या संस्थांमध्ये नोकरीस घेतले जाईल,अशी ग्वाही दिली. 

त्यानंतर येथील विश्रामगृहावर  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. राहुल जगताप, प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, प्रदेश सचिव संदीप वरपे, राजेंद्र फाळके, सबाजी गायकवाड, महिलाध्यक्ष मंजूषा गुंड, शारदा लगड, बाजार समिती उपसभापती भोरे, मधुकर राळेभात, डॉ.भास्कर मोरे,  दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, शरद शिंदे,  नगरसेवक अमित जाधव, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, शरद भोरे, संजय वराट यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

आ. वळसे पाटील म्हणाले की, झालेली घटना दुदैवी असून, जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर तेथे डॉक्टर नसल्याने त्यांना उपचार मिळाले नाही, त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. शवविच्छेदनासाठी जिल्ह्याबाहेर पुण्याला घेऊन जावे लागते. तसेच जखमींना खासगी दवाखान्यात नेण्यात आले, यांचे नेमके कारण समजले नाही. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली असून पालकमंत्री राम शिंदे यांच्या जिल्ह्यात चाललं काय असे समजत नाही. पोलिस व महसूल खात्यावर कोणाचाही वचक राहिला नाही. तालूक्यात सर्वच विभागात प्रभारी राज आहे. तालूक्यामध्ये गुंडाना सत्ताधार्‍यांकडून राजश्रय मिळत असल्याने अशा घटना घडत आहे. त्यामुळेच पोलिस खाते हतबल झाले आहे. 

नगर येथे राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसकर आले होते. या घटनेसंदर्भात त्यांनी चुकीचे वक्‍तत्व केले. गृहमंत्री यांनी अगोदर माहिती घ्यायची असते व नंतरच बोलावे लागते. केडगांव प्रकरणात न्याय करताना दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले व अटकही झाली. पंरतु शिवसेनेच्या 600 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होवून त्यांना पकडले जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.