Mon, Aug 19, 2019 07:11होमपेज › Ahamadnagar › दिंगबर ढवण यांची पक्षालाही सोडचिठ्ठी!

दिंगबर ढवण यांची पक्षालाही सोडचिठ्ठी!

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 24 2018 10:24PMनगर : प्रतिनिधी

दिगंबर ढवण यांची जिल्हा उपप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाप्रमुखांची भेट घेवून पदाचा राजीनामा सादर केला आहे. मी पदासह पक्षाचाही राजीनामा दिला आहे. पत्नी शारदा ढवण यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला असून आयुक्‍तांकडे राजीनामा देण्यासंदर्भात मतदारांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे ढवण यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, राजीनामा पत्रात ढवण यांनी नाराजी व्यक्‍त करत शहराचे नेतृत्व सेना संपवायला निघाल्याचा आरोपही केला आहे.

सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या प्रश्‍नाबाबत ढवण पती-पत्नींनी मनपावर मोर्चा काढला होता. प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी महापौरांची भेट घेत गेल्या अडीच वर्षात आमच्यावर कायम अन्याय होत असल्याचे तसेच सत्ताधारीच माजी आंदोलने चिरडून विरोधी पक्षाच्या सदस्याला मदत करत असल्याचा आरोप केला. प्रभागातील कामांना निधी देत नाहीत, जाणीवपूर्वक मला टाळले जाते, असे म्हणत त्यांनी महापौर कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी ढवण यांनी आक्रमक भूमिका घेत महापौरांसह इतरांनाही अरेरावी केली. या संदर्भात बुधवारी (दि.23) सायंकाळी शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी बैठक घेतली.

शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींसह सर्व नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संपर्क प्रमुख कोरगांवकर यांनी ढवण यांच्याबाबत नगरसेवकांकडून मते जाणून घेतली. महापौर दालनात घडलेल्या प्रकाराची माहिती घेवून या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्‍त केली. उपस्थित सर्वांनीच ढवण यांच्या कृत्यावर नाराजी व्यक्‍त केली. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांनी ढवण यांची जिल्हा उपप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तसेच उर्वरीत सर्व बाबींबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अहवाल पाठविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी हकालपट्टीच्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिल्यानंतर दिगंबर ढवण यांनी कार्यकर्त्यांसह यश पॅलेस येथे गाडे यांची भेट घेऊन जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा सोपवला. तसेच शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा सोपविला. संघटनेत मला कुठल्याही कार्यक्रमात विश्‍वासात घेतले जात नाही. उलट विरोधी कार्यकर्त्याला ताकद देऊन शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करुन त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. शहराचे नेतृत्व शिवसेना संपवायला निघाले असा आरोप करत त्यांना कंटाळून मी राजीनामा देत असल्याचे ढवण यांनी म्हटले आहे. शारदा ढवण यांनी राजीनामा देतांना प्रभागात विकासकामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार केली आहे. सातत्याने प्रभागावर अन्याय केला जातो. विकासकामे होत नसल्याने मी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मतदारांशी चर्चेनंतर आयुक्‍तांकडे राजीनामा : ढवण

पक्षाकडे राजीनामा सोपविला असला तरी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्‍तांकडे सोपविण्याबाबत मतदारांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे दिगंबर ढवण यांनी स्पष्ट केले. सध्या मी कुठल्याही पक्षात नाही, स्वतंत्र आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक अपक्षही लढू शकतो. आगामी निवडणुकीत अपक्ष लढून सर्वसामान्यांची ताकद दाखवून देणार असल्याचेही ढवण यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.