Sun, Jul 21, 2019 16:20
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › तीन वाहनांचा अपघात; महिला ठार

तीन वाहनांचा अपघात; महिला ठार

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:11AMराहाता : प्रतिनिधी

परिसरात नगर-मनमाड महामार्गावर काल सकाळी तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघात एका महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी झाले. बसमधील 65 प्रवासी सुखरूप बचावले.  लहानूबाई ज्ञानेश्‍वर पवार (वय 45) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता शहरात शिवाजी चौकामध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास मनमाड आगाराची (एम. एच. 14, बी. टी. 3273) ही राज्य परिवहन महामंडळाची बस मनमाडकडून अहमदनगरला जात असताना त्या बसला एक मोटारसायकलस्वार आडवा गेल्याने त्यास वाचविण्याकरिता बसचालक कचरू हिरामण सोनवणे याने बस जोराने वळविली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने तिने रस्त्याच्या कडेला असलेल्या ऋषिकेश आहिरे याच्या पानटपरीला धडकली. ती टपरी 20 ते 25 फूट अंतरापर्यंत बसने फरफटत नेली. त्या टपरीमधील ऋषिकेश आहिरे या तरुणाला बसचा जोराचा मार लागल्याने त्याला तात्काळ शिर्डी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

बस रस्त्याच्या उजव्या बाजूला गेल्याने समोरून येणार्‍या स्विफ्ट डिझायर (क्र. एम. एच. 17 बी.व्ही. 5207) कारची आणि बसचीही धडक झाली. गाडीतील एअर बॅग ओपन झाल्याने स्विफ्ट चालक ढेसले यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. या जोराच्या धडकेमध्ये स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ मोटारसायकलस्वाराच्या चुकीमुळे हा अपघात घडला अशी चर्चा नागरीकांमध्ये होती. त्यामुळे हा विचित्र अपघात घडला. 

राहाता परिसरातील आज सकाळी सात वाजेदरम्यान अस्तगाव शिवारात कोर्टाजवळ इको कंपनीची एम. एच. 12, जी. व्ही. 267 या चार चाकी वाहनामध्ये पती- पत्नी शिर्डी येथे जात असताना गाडीवरील ताबा सुटून गाडी उलटली. त्यामध्ये पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डी येथे हलविण्यात आले. 

याबाबत पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नसून त्यांची नावे समजली नाहीत. रविवारी रात्री ज्ञानेश्‍वर पवार व त्यांची पत्नी लहानूबाई ज्ञानेश्‍वर पवार (वय 45) हे दोघे सायकलवर जात असताना त्यांना मागून येणार्‍या नवीन आयशर टॅम्पोने जोराची धडक दिल्याने ते दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. मार जास्त लागल्याने लहानूबाई ज्ञानेश्‍वर पवार या मयत झाल्या असून ज्ञानेश्‍वर पवार यांना मेंदूला मार लागल्याने त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आयशर कंपनीचा हा टॅम्पो इंदूर येथे चालला होता. अशा प्रकारे शहरात आज तीन वेगवेगळे अपघात घडले आहेत.