Mon, Sep 24, 2018 09:24होमपेज › Ahamadnagar › लिम्का बुकमध्ये  ढूस यांची हॅट्ट्रिक!

लिम्का बुकमध्ये  ढूस यांची हॅट्ट्रिक!

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 02 2018 11:57PMराहुरी : प्रतिनिधी

बालपणापासूनच गगनभरारी घेण्याचे स्वप्न बाळगणार्‍या देवळाली प्रवराच्या आप्पासाहेब ढूस यांनी नुकतीच राष्ट्रीय विक्रमांची हॅट्रीक साधत लिम्का बुक ऑफ रेकॉडर्स 2018 मध्ये तब्बल तिसर्‍यांदा नाव कोरले आहे. 

नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावचे सुपूत्र असलेल्या आप्पासाहेब भिमराज ढूस यांनी नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशीप टेस्ट स्पर्धेत प्युअर ईकॉनॉमी टास्कमध्ये भारत देशाला पहिले सुवर्ण पदक जिंकून देत इतिहास रचला आहे. त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेतली आहे. 

आप्पासाहेब ढूस यांच्या या उत्तुंग कामगिरीमुळे हवेतील साहसी क्रीडा प्रकारातनगर जिल्हाचे नाव पुन्हा एकदा देशाच्या व जगाच्या नकाशावर प्रकाशझोतात आले असून नगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

आप्पासाहेब ढूस यांच्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये हा तिसरा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला आहे. यापूर्वी सन 2009 मध्ये 12 हजार फूट उंच विमानातून 12 वेळेस उडी मारण्याचा पहिला राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावे नोंदविला गेला आहे. तसेच सन 2016 मधील पॅरामोटर क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक रजत व दोन कास्य पदके जिंकून  देशाला पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून देणारा खेळाडू ठरल्याबद्दल त्यांच्या नावे दुसरा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला होता. दि. 30 एप्रिल ते 6 मे 2018 या कालावधीत थायलंडमध्ये होणार्‍या पॅरामोटर या हवेतील साहसी क्रीडा प्रकाराच्या जागतिक स्पर्धेत ढूस हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.