Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Ahamadnagar › मेंढरांसह धनगर समाजाचे ठिय्या आंदोलन

मेंढरांसह धनगर समाजाचे ठिय्या आंदोलन

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 25 2018 1:12AMनगर : प्रतिनिधी

अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगर समाजाचा तात्काळ समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने मेंढयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय ठिय्या आंदोलन केले. तीन महिन्यांत आरक्षण लागू करा अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाच्या सुची 2 प्रमाणे आयोगाने नं. 36 वर धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये आरक्षण दिले आहे. परंतु उच्चाराच्या फरकाने धनगर ऐवजी धनगड झाले आहे.  र चा ड झाल्यामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. आरक्षणासाठी धनगर समाज गेल्या 60 वर्षांपासून आंदोलन करीत आहे. परंतु अद्यापि अमंलबजावणी झाली नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने काल (दि.24) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी गोपीचंद पडळकर, डॉ. इंद्रकुमार भिसे, सचिन डफळ, दिगंबर ढवण, दादाभाऊ चितळकर, आण्णासाहेब बाचकर यांनी जोरदार भाषण करुन, समाजाला  आरक्षणासाठी एकजूट करण्याचे आवाहन केले. अन्याय-अत्याचार सहन करणाराच खरा गुन्हेगार असल्याचे सांगत, पडवळकर यांनी आरक्षणासाठी पेटून उठण्याचे धनगर समाजाला आवाहन केले. आरक्षणास विलंब होत असल्याने परमेश्‍वर घोंगडे व योगेश कारके या दोन युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. या युवकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्‍तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, आरक्षणासाठी आंदोलने, मोर्चे काढणार्‍या काही युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे शासनाने त्वरित मागे घ्यावेत तसेच आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ केली जावी, या मागण्यांचे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

या आंदोलनात भगवान जर्‍हाड, विजय तमनर, वैशाली नान्‍नोर, निवृत्ती दातीर, काकासाहेब शेळके, बबनराव पडोळकर, बापूसाहेब वडितके, भाऊसाहेब राशीनकर आदींसह धनगर समाजाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.