Thu, Jun 27, 2019 18:09होमपेज › Ahamadnagar › धनगर आरक्षण आंदोलनही पेटणार

धनगर आरक्षण आंदोलनही पेटणार

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMजामखेड : प्रतिनिधी 

धनगर आरक्षणप्रश्‍नी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी राज्यभर तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 8 सप्टेंबरला चौंडीत होणार्‍या महामेळावात सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार आहे.

आरक्षणप्रश्‍नी तालुक्यातील चौंडी येथे धनगर समाज महासंघातर्फे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धनगर समाज आरक्षण प्रश्राचे अभ्यासक व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आ. रामहरी रूपनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस माजी मंत्री अण्णा डांगे, अहिल्या आघाडीच्या अलका गोडे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती करडे, सुनील वाघ, चौंडीचे सरपंच अभिमन्यू सोनवणे, अविनाश शिंदे यांच्यासह महासंघाचे  राज्यभरातील 23 जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते.

बैठकीत सर्वच पदाधिकार्‍यांनी आरक्षणप्रश्री तीव्र भावना व्यक्त केल्या. धनगर समाज आरक्षण प्रश्‍नी भाजपाचे सरकार वेळकाढूपणा करत असून, मागील चार वर्षे केवळ अभ्यास चालू असल्याचे सांगून अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी बारामतीत झालेल्या आंदोलनात सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्त येऊनही 4  वर्षांत काहीही कार्यवाही झाली नाही.  

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनी राज्यभर तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याबरोबरच ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलने करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यभरात करण्याची आंदोलने आणि चौंडीतील महामेळाव्याच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा निर्धार यावेळी केला. तर तिथीप्रमाणे पुण्यतिथी साजरी करताना 8 सप्टेंबर रोजी चौंडी येथे धनगर समाजाचा महामेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यास सर्वच पक्षातील धनगर समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या महामेळाव्यास राज्यातील जबाबदार मंत्रीही उपस्थित राहणार असल्याने धनगर आरक्षणप्रश्री ठोस आश्वासन मिळण्याची आशा असल्याचे आ. रूपनर यांनी सांगितले.