Fri, Apr 26, 2019 09:28होमपेज › Ahamadnagar › भरपावसात धनगर आरक्षण मोर्चा 

भरपावसात धनगर आरक्षण मोर्चा 

Published On: Aug 21 2018 1:30AM | Last Updated: Aug 20 2018 11:02PMनेवासा : प्रतिनिधी 

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 20)  नेवासा तहसील कार्यालयासमोर भरपावसात मोर्चाद्वारे ‘ढोल बजाव’ आंदोलन केले. यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर, उत्तमराव जानकर, माजी आ. शंकरराव गडाख हे उपस्थित होते.  

दरम्यान, मोठ्या प्रमाणात डफ, ढोल, ताशांचा दणदणाट व हातात पिवळे ध्वज घेऊन असलेल्या हजारो तरुण-तरुणी व महिलांच्या येळकोट.. येळकोट.. जय मल्हार..! च्या गगनभेदी जयघोषांनी नेवासानगरी दणाणली. पिवळे ध्वज, पिवळे फेटे व पिवळ्या भंडार्‍याची उधळण, यामुळे सर्वत्र रस्ते पिवळे दिसत होते. नेवासा शहराला सोमवारी सोन्याच्या जेजुरीचे रुपडे आले होते. मोर्चात मेंढ्याही आणण्यात आल्या होत्या.  

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात, या प्रमुख मागणी बरोबरच धनगर समाजाला सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी, शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे उपलब्ध करावीत, धनगर समाजाच्या मुला-मुलींसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करावी, शेळी-मेंढी विकास महामंडळास बजेटमध्ये तरतूद करावी, आरक्षणासाठीच्या आंदोलनप्रसंगी दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी सोमवारी  साडे अकरा वाजता बाजार समिती ते  नेवासा तहसील कार्यालय असा ‘ढोल बजाओ’ आंदोलनास प्रारंभ करण्यात आला होता. याबरोबरच प्रत्येक गावातून मोटारसायकल रॅली काढून तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. 

यावेळी माजी आ. गडाख म्हणाले की, या मोर्चात सर्व समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. नेवासा तालुका आज जेजुरी झाला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर, मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी कशाचीही पर्वा न करता तुमच्या पाठिशी उभा राहिल. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर यांनी सांगितले की, दुसर्‍या राज्यातील सरकारने घटना दुरुस्ती केली. परंतु गेल्या काही वर्षात धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मागील सरकार तसेच सध्याच्या सरकारने आपल्यासाठी काहीही केले नाही. राज्यातील 2 कोटी समाज हिच आपली ताकत आहे. या ताकदीवर राज्याची दिशा बदलण्याची क्षमता असल्याचे सांगून अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.

प्रतिक्षा भगत हिच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनादरम्यान नेवासा शहरात उपविभागीय  पोलिस अधिकारी  मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नेवासा वकील संघ व आ.बाळासाहेब मुरकुटे मित्रमंडळाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.