Tue, Nov 13, 2018 04:04होमपेज › Ahamadnagar › धनगर समाजाचे तीन तास रास्तारोको

धनगर समाजाचे तीन तास रास्तारोको

Published On: Aug 28 2018 1:18AM | Last Updated: Aug 27 2018 10:30PMकर्जत : वार्ताहर

राज्यातील भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जाती-धर्मांत फूट पाडली आहे. तसेच धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्‍वासनही पाळलेले नाही. त्यामुळे आता भाजप सरकार पडेपर्यंत समाजबांधवांनी स्वस्थ बसू नये. ज्या प्रमाणे ब्रिटिशांच्या विरोधात चले जावची चळवळ देशभर उभारण्यात आली होती, त्याच प्रमाणे या सरकारच्या विरोधात देखील चलेजावची घोषणा करीत आहे, असे प्रतिपादन आरक्षण कृती समितचे प्रमुख डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी कर्जत येथे बोलताना केले. 

कर्जत येथे काल (दि.27) धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आदिवासी धनगर समाज कृती समितीतर्फे मोर्चा काढून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे तीन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आठवडे बाजाराचा दिवस असल्याने वाहनकोंडी झाली होती. यावेळी अहिल्यादेवी यांचे वंशज अक्षय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रसचे प्रवीण घुले, बाळासाहेब साळुंके, कैलास शेवाळे, युवकचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, डॉ. हजारे, संतोष देवकाते, जोगबापू बजंगे, काशिनाथ देवकाते, दीपक भोगे, केसकर, गोरे, हुलगुंडे, कोपनर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

डॉ. भिसे म्हणाले, सर्वसामान्य जनतेचा आवाज दडपण्याचे काम मुख्यमंत्री व पालकमंत्री करीत आहेत. राज्य सरकारने फोडा आणि झोडा ही इंग्रजांची नीती वापरली आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करून सत्ता टिकविली आहे. मात्र आता सर्व समाज जागा झाला आहे. आरक्षणाची मागणी केली म्हणून पोलिसांच्या मार्फत मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, माझा दवाखाना बंद पाडला. धमक्या दिल्या जात आहेत. मात्र मी मरणाला भीत नाही. मी धनगर समाजाला आरक्षण मिळवू देण्यासाठी वेडा झाला आहे, असे डॉ. भिसे म्हणाले.

यावेळी अक्षय शिंदे म्हणाले, आज राज्य सरकारमध्ये समाजाचे दोन मंत्री आहेत. मात्र त्यांनी एकाही मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाची मागणी केलेली नाही, हे आपले दुर्दैव आहे. त्यांनी समाजाचा वापर फक्त सत्ता मिळविण्यासाठी केला आहे. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. 

फाळके म्हणाले, भाजपला सत्ता देऊन जनतेला आज त्यांची चूक कळली आहे. भाजपची सत्तेची भाकरी करपली असून, ती यावेळी उलटली जाणार आहे. यावेळी  साळुंके, कैलास शेवाळे, प्रवीण घुले, दादासाहेब सोनमाळी, श्री झिंगे, डॉ. हजारे, केसकर यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन जोगबापू बजंगे यांनी केले.