होमपेज › Ahamadnagar › लोकसहभागातून विकास हेच खरे स्वातंत्र्य 

लोकसहभागातून विकास हेच खरे स्वातंत्र्य 

Published On: Aug 17 2018 1:33AM | Last Updated: Aug 16 2018 10:29PMपारनेर : प्रतिनिधी

जनता व प्रशासन यांच्या समन्वयातून काम झाले तर सुराज्य निर्माण होईल, असा विश्‍वास व्यक्‍त करतानाच जनतेच्या सहभागातून होणारा विकास हेच खरे स्वातंत्र्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्‍त केला. 

नुतनीकरण करण्यात आलेले पारनेर पोलिस ठाणे तसेच पोलिस विश्रमागृहाचे हजारे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात हजारे बोलत होते. पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, गृह विभागाचे उपअधिक्षक अरूण जगताप, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व राजेंद्र पाटील, नगराध्यक्षा वर्षा नगरे, अशोक कटारिया, ज्येष्ठ पत्रकार संजय वाघमारे, गंगराम बेलकर, शंकर नगरे,  हसन राजे, सहदेव तराळ, शाहीर गायकवाड, दत्‍तात्रय आंबुले, समिर आंबे, ठकाराम लंके, किसन रासकर आदी यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, अधिक्षक शर्मा यांची कामाप्रती असलेली तळमळ प्रत्येक भेटीत जाणवते. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलिस दलाचा चेहरा मोहरा बदलला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केवळ पोलिसांचीच नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचीही आहे. पोलिस व समाज एकत्र आले तर रचनात्मक काम कसे उभे राहू शकते, याचे पारनेर पोलिस ठाण्याची अद्ययावत इमारत हे उत्‍तम उदाहरण आहे.

शर्मा म्हणाले, प्रशस्त व स्वच्छ जागेत काम करण्यात कर्मचार्‍यांचा, अधिकार्‍यांचा उत्साह वाढतो. कामानिमित्‍त पोलिस ठाण्यात आलेल्या नागरिकांनाही प्रसन्न वाटते. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची कार्यपद्धती समाजाभिमुख असावी. याच भावनेतून जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यांचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्याचा आपला प्रयत्न आहे. नगर येथील पोलिस मुख्यालयात जिल्ह्यातील तीन हजार कर्मचार्‍यांच्या सहभागातून 90 लाख रूपयांची देखणी वास्तू उभी राहिल्याचे शर्मा यांनी यावेळी सांगितले. उपअधीक्षक जगताप, संजय वाघमारे, शाहीर गायकवाड, अशोक कटारिया, मार्तंड बुचूडे, सचिन पठारे यांचीही भाषणे झाली. हनुमंत गाडे यांनी प्रास्ताविक तर उपनिरीक्षक रामेश्‍वर घुगे यांनी सूत्रसंचलन केले.

25 टक्के पुरुषांच्या तक्रारी!

मुख्यालयात कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी उभारलेल्या दिलासा सेलला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. राज्यात नागपूर व  नगर येथेच दिलासा सेल कार्यरत असल्याचे सांगून या सेलमध्ये प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचाराच्या महिलांच्या तक्रारी येत असल्या, तरी महिलांकडून पुरूषांवर होणार्‍या अन्यायाच्या तक्रारीही येतात. त्याचे प्रमाण 25 टक्के असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

पोलिस ठाण्यात येण्याची भिती वाटते!

खरे तर पोलिस ठाण्यात येण्याची भिती वाटते. कारण येथे अनेक उद्योग चालतात. त्यामुळे बदनामीची भिती असते. मात्र अधीक्षक शर्मा व निरीक्षक गाडे यांचे काम चांगले आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर आपण पोलिस ठाण्यात आल्याचे हजारे म्हणाले.