Thu, May 23, 2019 20:52
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › कोळपेवाडी दरोड्यातील आरोपींची शोधमोहीम

कोळपेवाडी दरोड्यातील आरोपींची शोधमोहीम

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 22 2018 11:52PMनगर : प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज व रेखाचित्रांच्या आधारे कसून शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची विशेष पथके आरोपींच्या मागावर आहेत. गुन्ह्याचा तपास शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

रविवारी (दि. 19) सायंकाळी कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर काही दरोडेखोरांनी दरोडा टाकून त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणार्‍या मालकावर गोळीबार केला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांत घबराट पसरली आहे. सीसीटीव्ही फूटेज व पोलिसांना मिळालेल्या वर्णनावरून तीन संशयितांची रेखाचित्रे जाहीर करण्यात आलेली आहेत. त्या रेखाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच काही खबरी नेटवर्कचाही वापर केला जात आहे.

कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाची दरोडेखोरांनी कशी टेहाळणी केली, ते कशापद्धतीने आले, त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आदींचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांकडून आरोपींची माहिती घेतली जात आहे. खुनासह दरोडे टाकण्याचा पूर्वइतिहास असलेल्या काही टोळ्यांतील तुरुंगाबाहेर असलेल्या सदस्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणताही ठोस ‘क्ल्यू’ पोलिसांना मिळालेला नाही. मात, लवकरच आरोपींना पकडण्यात यश मिळेल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.  

पोलिसांकडून सराफांच्या बैठका

जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सूचनेवरून पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांकडून सराफ व्यावसायिकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्या बैठकांत सराफ व्यावसायिकांकडून त्यांच्यासमोरच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. तसेच व्यावसायिकांनी चोर्‍या, दरोड्याचे प्रकार टाळण्यासाठी काय-काय दक्षता घेतली पाहिजेत, याबाबतच्या सूचना दिल्या जात आहेत.