होमपेज › Ahamadnagar › जेसीबीच्या साहाय्याने गणेश मंडप उद्ध्वस्त!

जेसीबीच्या साहाय्याने गणेश मंडप उद्ध्वस्त!

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:20PMनगर : प्रतिनिधी

नेता सुभाष चौकातील विनापरवाना गणेश मंडप महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.3) कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंडप स्वतःहून काढून घेण्याची तयारी दर्शविली असतांना त्याची तोडफोड करुन नुकसान केल्याचा आक्षेप घेत शिवसेनेने मनपा प्रभाग अधिकारी प्राजित नायर व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सुरेश इथापे यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

गणेशोत्सव व मोहरम उत्सव एकाच कालावधीत येत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रविवारी (दि.2) सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस प्रशासनाने विसर्जन मार्गाची पाहणी केली. यात दाळमंडई येथे भाजप कार्यकर्त्याने दहीहंडी उत्सवासाठी उभारलेला स्टेज विनापरवाना असल्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याने रात्री स्वतःहून स्टेज काढून घेतला. त्यानंतर मनपा व पोलिसांच्या पथकाने नेतासुभाष चौकात येवून गणेशोत्सवासाठी उभारलेला मंडप काढण्याचा प्रयत्न केला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी याला आक्षेप घेतला. त्यानंतर सोमवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास मनपाच्या पथकाने पुन्हा येवून मंडप काढण्याची कारवाई सुरु केली. शिवसेना पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करुन परवानगीसाठी नुकताच कक्ष स्थापन झाला असून, परवानगी मागण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र, मनपा प्रभाग अधिकारी नायर काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने मंडप उभारणार्‍याने स्वतःहून मंडप काढून घेण्याची तयारी दर्शविली. त्याउपरही अधिकार्‍यांनी जेसीबी आणून मंडप जमीनदोस्त केला. स्वस्तिक चौकातील शिवसेनेच्या नेत्यांचा गणेश मंडपही काढून घेण्यास प्रशासनाने भाग पाडले. मात्र नेता सुभाष चौकातील मंडप पाडण्यात आल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मंडपाचे नुकसान करण्यात आल्यामुळे संतापलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी या कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

कारवाईनंतर उपनेते अनिल राठोड यांच्या सह पदाधिकार्‍यांनी कोतवाली पोलिस ठाणे गाठून जेसीबीच्या सहाय्याने गणेश मंडपाची मोडतोड करुन 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान केल्याची व धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, नुकसान करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईसाठी चौकातच उपोषण सुरु केले आहे.

सभागृह नेते गणेश कवडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम यांनीही प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली. माजी सभागृह नेेते अनिल शिंदे यांनीही त्यांचा मंडप रस्त्याला अडथळा ठरत नसतांनाही काढायला लावल्याचे सांगत त्याच ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाहतूकदारांवर मात्र कारवाई केली नसल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, सायंकाळी उशिरा शिवसेना पदाधिकार्‍यांनी अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नुकसान करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होईपर्यंत शिवसेना माघार घेणार नाही, अशी भूमिका यावेळी शिवसेनेने स्पष्ट केली. या चर्चेत तोडगा न निघाल्याने रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.

मनपा ‘एक खिडकी’ कक्ष नावापुरताच!

गणेशोत्सवात मंडपांना परवानगी देण्यासाठी मनपा, पोलिस, बांधकाम विभाग व महावितरणच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करुन एक खिडकी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या ना हरकत दाखल्यासाठी पुन्हा पोलिस ठाण्याचाच रस्ता गणेश मंडळांना दाखविण्यात आल्यामुळे ‘एक खिडकी’ कक्ष नावापुरताच राहिल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी शहरात कारवाई सुरु झाल्यानंतर अनेकांनी मनपात परवानगीसाठी धाव घेतली. मात्र, यावेळीही अधिकारी कक्षात उपस्थित नसल्याच्या तक्रारी गणेश मंडळांकडून करण्यात आल्या.

रविवारी रात्रीच कारवाईचा प्रयत्न!

रविवारी रात्रीच्या वेळी प्रशासनाने गणेश मंडपावर कारवाईचा प्रयत्न केल्यानंतर माजी आमदार अनिल राठोड यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. सदरचा मंडप विसर्जन मार्गावर नाही. रस्ता बंद केलेला नाही. अग्निशामक दलाची गाडी, रुग्णवाहिका जाईल एवढी जागा सोडण्यात आलेली आहे. तसेच मनपाचे मंडप धोरण निश्‍चित नसल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली गणेशोत्सवावर निर्बंध लादू नका, असे राठोड यांनी चर्चेदरम्यान सांगितले होते.