Sat, Jul 20, 2019 15:07होमपेज › Ahamadnagar › उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नाही; छिंदमचा दावा

उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नाही; छिंदमचा दावा

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 04 2018 11:43PMनगर : प्रतिनिधी

मी स्वतःची स्वाक्षरी असलेला उपमहापौर पदाचा कोणताही राजीनामा महापौर व महापालिका आयुक्‍तांकडे दिलेला नाही. ज्या तारखेचा राजीनामा दाखविण्यात आला आहे, त्यावेळी मी कोठडीत असल्याने असा कोणताही राजीनामा मी करुन देणे शक्य नव्हते. महापौरांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करुन, राजकीय षडयंत्र करुन माझी बनावट सही असलेला उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर करण्याचा गुन्हा केलेला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, असा खुलासा श्रीपाद छिंदमने नगरविकास विभागाकडे केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी तत्कालीन उपमहापौर छिंदम विरोधात तीव्र पडसाद उमटले होते. महापालिकेत महासभेने नगरसेवक पद रद्द करण्याचा एकमताने ठराव मंजूर करत तो शासनाकडे पाठविला आहे. शासनाने 14 मे रोजी श्रीपाद छिंदमला नोटीस बजावून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. नोटिसीला उत्तर देतांना छिंदम याने नगरसेवक पद रद्द करण्याच्या ठरावाला आक्षेप घेत उपमहापौर पदाचा राजीनामाच दिलेला नसल्याचा दावा केला आहे. 26 फेब्रुवारी 2018 रोजीच्या महासभेत घेण्यात आलेल्या प्रस्तावाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने मनपा अधिनियम 13(1)(अ) नुसार माझ्याविरुध्द सद्यस्थितीत कोणतीही कारवाई करणे तसेच त्या अनुषंगाने नगरसेवक पद रद्द करणे बेकायदेशीर ठरते.

16 फेब्रुवारी 2018 रोजी माझ्यावर करण्यात आलेला आरोप न्यायालयाने मान्य केलेला नसून त्याबाबत मला कोणतीही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. परंतु, माझ्या कोणत्याही स्वाक्षरीशिवाय माझेविरुध्द बनावट कागदपत्रांद्वारे षडयंत्र रचण्यात आले आहे. मी स्वतःची स्वाक्षरी असलेला उपमहापौर पदाचा कोणताही राजीनामा महापौर व महापालिका आयुक्‍तांकडे दिलेला नाही. उलटपक्षी उपमहापौर पदाचा राजीनामा ज्या तारखेचा दाखविण्यात आला आहे, त्यावेळी मी कोठडीत असल्याने असा कोणताही राजीनामा मी करुन देणे शक्य नव्हते. महापौरांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करुन, माझी बनावट सही असलेला उपमहापौर पदाचा राजीनामा वापरुन, माझ्यावर कस चालू असतांना त्याचा गैरफायदा घेवून व राजकीय षडयंत्र करुन माझ्या उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर करण्याचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे.

याबाबत स्वतंत्र कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे. माझे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठरावही याच पध्दतीने घाईघाईने कोणत्याही कायदेशीर बाबी न पडताळता तसेच महापालिका अधिनियम कलम 13(4) नुसार न्यायालयीन मत न मागवता करण्यात आलेला असून मी कलम 13 (2) मधील तरतुदीनुसार आक्षेप नोंदविले आहेत. अशोभनीय वर्तवणुकीबाबत मी दोषी ठरलेलो नसून न्यायालयाने मला जामीन मंजूर केलेला आहे व सदरची बाब न्यायप्रविष्ट असल्याने सदरची नोटीस रद्द करावी, असे छिंदम याने शं. त्र्य. जाधव, उपसचिव, नगरविकास विभाग यांना 1 जून 2018 रोजी दिलेल्या दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. काल 4 जून रोजी महापालिका आयुक्‍त व नगरसचिव यांनाही या उत्तराची प्रत देण्यात आली आहे.