Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Ahamadnagar › पहिल्यांदाच शिवसेनेचा उपमहापौर

पहिल्यांदाच शिवसेनेचा उपमहापौर

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 10:34PMनगर : प्रतिनिधी

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे प्रायश्‍चित्त घेवून ‘भाजपा’ने शिवसेनेची कोंडी करण्याचा केलेला प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माघारीमुळे फसला. घोडेबाजार टाळण्याच्या नावाखाली अखेरच्या क्षणी ‘राष्ट्रवादी’ने मैदान सोडून शिवसेनेचा मार्ग मोकळा केला. तर ‘स्थायी’च्या सभापती पदावर गंडांतर येण्याच्या भीतीने ‘मनसे’नेही नांगी टाकल्यामुळे सेनेच्या अनिल बोरुडे यांची उपमहापौर पदावर बिनविरोध निवड झाली. दरम्यान, बोरुडे यांच्या रुपाने मनपाच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा उपमहापौर झाला. महापौर-उपमहापौर ही दोन्ही प्रमुख पदे एकाच पक्षाकडे असण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.

श्रीपाद छिंदम याच्या आक्षेपार्ह वक्‍तव्यामुळे भाजपाला उपमहापौर पद गमवावे लागले. त्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेवर काल (दि.5) निवडणूक पार पडली. छिंदम प्रकरणामुळे ‘बॅकफूट’वर गेलेल्या भाजपाने (गांधी गट) ‘प्रायश्‍चित्त’ करत पदावर पाणी सोडून निवडणुकीवरही बहिष्कार टाकला. त्यामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच उपमहापौर पदासाठी उमेदवार दिला होता. शिवसेनेच्या होणार्‍या संभाव्य कोंडीचा फायदा घेण्यासाठी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने आरिफ शेख व विपुल शेटीया यांचे अर्ज दाखल करत सत्ताधार्‍यांना आव्हान दिले होते. तर सत्तेत असलेल्या मनसेनेही रिंगणात उडी मारत वीणा बोज्जा यांचा अर्ज दाखल केला होता.

त्यापाठोपाठ विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या बंडखोर गटानेही समद खान, मुदस्सर शेख यांचे अर्ज दाखल करुन नाराजी व्यक्‍त केली. दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात दुखावल्या गेलेल्या दीपाली बारस्कर यांनीही सागर बोरुडे व सारिका भुतकर यांच्या मदतीने अर्ज दाखल करुन बंड पुकारले होते. बंडखोर गटाची नाराजी, बारस्कर यांची समजूत काढण्यात शिवसेनेला आलेले यश व सुरुवातीपासून भाजपाच्या आगकर गटाने दिलेली साथ यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाल्यानंतर पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने मैदान सोडून शिवसेनेची वाट मोकळी केली. त्यातच सभापती पद गमवावे लागण्याच्या भीतीने मनसेनेही नांग्या टाकत सपशेल माघार घेतली.

उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत समद खान, मुदस्सर शेख, दीपाली बारस्कर, विपुल शेटीया, आरिफ शेख, वीणा बोज्जा यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बोरुडे यांच्या रुपाने शिवसेनेला पहिल्यांदाच उपमहापौर पदावर संधी मिळाली असून महापौर व उपमहापौर एकाच पक्षाचा असण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, बोरुडे यांच्या निवडीनंतर शिवसेनेने ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणाही देण्यात आल्या.

भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीचा बहिष्कार!

उपमहापौर निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेवर भाजपाच्या गांधी गटासह काँग्रेस व राष्ट्रवादीने बहिष्कार टाकला. भाजपाने काल (दि.5) सकाळीच तटस्थ राहणार असल्याचे सांगत मतदानातही सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय जाहीर करुन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यावर काँग्रेसनेही सभागृहातच न जाण्याचा निर्णय घेतला.

सभागृहात 38 पैकी 36 सदस्य सेनेच्या बाजूने?

भाजप (गांधी गट), काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर सभागृहातील सदस्यांच्या हजेरीकडे लक्ष लागले होते. शिवसेनेच्या 19 सदस्यांसह राष्ट्रवादीचे 7, काँग्रेसचे 4, भाजपाच्या आगरकर गटाचे 3, मनसेचे 2 व अपक्ष 3 असे एकूण 38 सदस्य सभागृहात उपस्थित होते. यातील राष्ट्रवादीचे आरिफ शेख व विपुल शेटीया वगळता अपक्ष स्वप्निल शिंदे यांच्यासह 35 सदस्य शिवसेनेच्या बाजूने कौल देणार होते, असा दावा केला जात आहे.

लवकरच स्थायी सदस्य निवडीचा अजेंडा!

सत्तेत सहभागी होवून स्थायी समितीचे सभापती उपभोगणार्‍या मनसेने विरोधात अर्ज दाखल केल्यामुळे सेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी, नगरसेवक संतापले आहेत. त्यातच दीपाली बारस्कर, सागर बोरुडे यांना ‘स्थायी’च्या सदस्य पदाचा शब्द देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. निवडणूक पार पडताच त्यांनी सदस्य निवडीचा अजेंडा काढण्यासाठी पदाधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे लवकरच अजेंडा काढला जाण्याची शक्यता आहे.