Fri, May 24, 2019 07:16होमपेज › Ahamadnagar › पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:24AMपाथर्डी : प्रतिनिधी

नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पाथर्डीत सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. बंदला हिंसक वळण लागून दोन एसटी बसेसच्या काचा फोडल्या. दुपारी उशिरा छिंदम यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बंद मागे घेण्यात आला.

शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, मराठा समाजातील विविध संघटनांनी शहरातून मोर्चा काढून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जबाबदार पुलिस अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोलिस निरीक्षकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक महेश  बोरुडे, सोमनाथ अकोलकर, सुभाष घोरपडे, दादा डांगे, पंडित देवढे, देविदास पवार, हेमंत सुपेकर, सुनील कदम, पांडुरंग काकडे, बबन सबलस, आजिनाथ मोरे,अजय रक्ताटे,प्रतीक खेडकर, नासिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यापूर्वी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, भाऊसाहेब धस, भगवान दराडे, बाबासाहेब ढाकणे, अप्पा सातपुते, अंकुश चितळे आदींनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर शहरात अचानक तणाव निर्माण होऊन तरुणांचे टोळके दुकाने बंद करत घोषणा देत फिरू लागले. हातगाडी, फळविक्रेते, टपरीधारकांचे मोठी तारांबळ उडली. पळापळ सुरू होऊन रस्ता दिसेल तिकडे वाहनांसह वाहनधारक पळू  लागले. बाहेर गावच्या  प्रवाशांना सुद्धा सामान घेऊन सुरक्षित जागी आश्रय घ्यावा लागला. जुन्या बसस्थानक चौक व स्टेट बँकेसमोर संतप्त कार्यकर्त्यांनी आष्टी-पाथर्डी या आष्टी आगाराच्या बस गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक करत काचा फोडल्या.

तहसीलदार नामदेव पाटील यांनी त्वरित पोलीस बंदोबस्त वाढवला.सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी फौजफाट्यासह पाथर्डी पोलिस स्टेशनला धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली .त्यानंतर काही वेळाने पाथडी पोलिस स्टेशनचा पदभार घेण्यासाठी पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर दाखल झाले.पोलिस अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा करून छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

दादा डांगे यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केले. चित्रीकरण पाहून एसटी बसचे  नुकसान केल्याबद्दल व अन्य कलमांन्वये तक्रार दाखल करण्याची तयारी पोलिस प्रशासनाकडून सुरु आहे.  शहरात तणावपूर्ण शांतता असून गोंधळादरम्यान बाहेरून येणार्‍या चालकांनी पोलिस स्टेशन व अन्यत्र वळविल्या. मुलांना घेण्यासाठी पालकांनी शाळांपुढे गर्दी केली. विविध अफवांमुळे  तणावात भर पडली.सायंकाळी शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले. मात्र, रस्त्यावर वर्दळ नव्हती. सुमारे दोन तास एसटी बसेस बंद होत्या. सहा वाजता एसटी बसेस सुरू झाल्याचे एसटीतर्फे सांगण्यात आले.

श्रीगोंद्यात सर्वपक्षीय निषेधमोर्चा

श्रीगोंदाः प्रतिनिधी 

नगर महानगरपालिकेचे उपमहापौर व भाजपाचे कार्यकर्ते श्रीपाद छिंदम यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे श्रीगोंद्यात तीव्र पडसाद उमटले. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून तहसीलदार महेंद्र महाजन व पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन दिले. 

उपमहापौर छिंदम यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.रवी बायकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील दैवताचा श्रीपाद छिंदम अवमान केला असून, छिंदमच्या  विरोधात शासनाने कडक कारवाई करावी. नंदकुमार ताडे म्हणाले की, श्रीपाद छिंदमच्या विधानाने भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे . 
निषेध मोर्चात राजू गोरे, कुमार लोखंडे, मिलिंद दरेकर, तुकाराम दरेकर, रवी बायकर, अरविंद कापसे, नंदकुमार ताडे, संतोष खेतमाळीस, संतोष शिंदे, विशाल लगड यांनी निवेदन दिले. त्याअगोदर शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब शेलार यांनी  निषेधाचे निवेदन दिले.

छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन

पारनेर : प्रतिनिधी

उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पारनेर शहरातही तीव्र पडसाद उमटले. बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले.

सकल मराठा समाज तसेच शिवप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी पारनेर पोलिस ठाण्यात एकत्र येत छिंदम याच्या धिक्काराच्या तसेच शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या देत पारनेर पोलिस ठाण्यातही छिंदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे हे कामानिमित्त तालुक्यात गेल्याने कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्षेत होते. पाहता पाहता कार्यकर्त्यांची गर्दी वाढत जाऊन निरीक्षक गाडे येईपर्यंत बसस्थानक चौकात रास्ता रोको तसेच छिंदम याच्या पुतळयास जोडे मारून त्याचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस ठाण्यात जमा झालेले कार्यकर्ते पुतळयासह घोषणाबाजी करीत बाजारपेठेतून बसस्थानक चौकात जमा झाले. तेथे बसस्थानक परिसरातील नागरीकही आंदोलकांमध्ये सहभागी होऊन रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.

रास्तारोको प्रसंगी उपस्थितांसमोर बोलताना संजय वाघमारे म्हणाले, आता नाक घासून माफी मागण्याची तयारी दर्शविणार्‍या छिंदम विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यास कठोर शिक्षा झाल्याशिवाय महापुरूषांविषयी अपशब्द वापरण्याची कोणाची हिंमत होणार नाही. सुहास औटी यांनीही आपले विचार मांडले. छिंदमच्या पुतळयास जोडे मारण्यात आल्यानंतर त्याचे दहन करण्यात आले.  त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

तुषार औटी यांच्या तक्रार अर्जावरून स्टेशन डायरीवर नोंद घेण्यात येऊन तो अर्ज नगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, छिंदम याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास शनिवारी नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. संजय वाघमारे, तुषार औटी, विजय औटी, धीरज महाडुंळे, गौरव भालेकर, डॉ. नरेंद्र मुळे, दिपक नाईक, योगेश मते, महेंद्र मगर, सतीश म्हस्के यांच्यासह  कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन

शेवगावः  प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे  उपमहापौर श्रीपाद छिदम यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी विविध शिवप्रेमी संघटना, शिवजयंती उत्सव समिती, शेवगाव शहर व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निवेदन देवून या घटनेचा निषेध केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखविल्या आहेत. छिंदम यांचा विविध शिवप्रेमी संघटना, शिवजयंती उत्सव समिती, शेवगाव शहर व सर्वपक्षीय कार्यकर्ते निषेध व्यक्त करीत आहेत. त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात अशी मागणीही केली आहे.  निवेदनावर तुषार लांडे, तुषार पुरनाळे, कुलदिप फडके, प्रशांत भराट, उदय शिंदे, सचिन सातपुते, किरण पुरनाळे, नगरसेवक वजीर पठाण, रिजवान शेख यांच्यासह अनेक युवकांच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या : 

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

मुख्यालये सोडू नका

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!