Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Ahamadnagar › उपायुक्त चव्हाणांची पुण्यात होणार चौकशी

उपायुक्त चव्हाणांची पुण्यात होणार चौकशी

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 10:54PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्यातील वादग्रस्त कामांच्या बिल मंजुरीच्या काही फायलींवर उपायुक्त राजेंद्र चव्हाण यांच्या सह्या आहेत. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. चव्हाण हे दीर्घ रजेवर गेल्याने त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन तोफखाना पोलिस चौकशी करणार आहेत, असे पोलिस सूत्रांकडून समजले. 

प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप झिरपे या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक केल्यानंतर पोलिसांच्या रडारवर असलेल्या इतर अधिकारी, कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दराडे यांची जशा पद्धतीने काही बिलांवर स्वाक्षरी आहे, तशीच स्वाक्षरी उपायुक्त चव्हाण यांचीही आहे. ठेकेदार सचिन लोटके याने दराडे व झिरपे या दोघांना पैसे दिल्याचा जबाब पोलिस कोठडीतील चौकशीत दिल्याने त्यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. चव्हाण यांना पैसे दिल्याचा आरोप ठेकेदार लोटके याने केलेला नाही. परंतु, वादग्रस्त कामांच्या काही बिलांच्या मंजुरीवर उपायुक्त चव्हाण यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे चव्हाण हेही पोलिसांच्या रडारवर आहेत.

आरोपींची पोलिस कोठडी मागताना न्यायालयात तपासी अधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालात तसे नमूद करण्यात आलेले आहे. दराडे व झिरपे या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शुक्रवारपासून उपायुक्त चव्हाण हे दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे चव्हाण हे सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलिसांचे विशेष पथक लवकरच पुण्याला जाऊन चव्हाण यांच्याकडे चौकशी करणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

दरम्यान, गुन्ह्यातील फरार आरोपी व गुन्ह्याचा मास्टरमाईंड रोहिदास सातपुते याची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याच्या मुलालाही फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नोटीस पाठवून पोलिस ठाण्यात चौकशीकामी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विद्युत विभागाचा पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे हाही फरार आहेत.

दराडे, झिरपेच्या घरांची घेतली झडती

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्यातील आरोपी प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप झिरपे या दोघांच्या घराची काल (दि. 10) सकाळी तोफखाना पोलिसांनी झडती घेऊन पंचनामा केला. त्यानंतर या दोघांसह ठेकेदार सचिन लोटकेलाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पथदिव्यांच्या कामातील 34 लाख रुपयांच्या गैरव्यवहाप्रकरणी गुरुवारी तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या पथकाने निलंबित प्रभारी उपायुक्त दराडे, कॅफो झिरपे या दोघांना अटक केली होती. या दोघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी दुपारी त्यांना महापालिकेतील मुख्य वित्त व लेखा अधिकार्‍यांच्या दालनात नेऊन बंद खोलीत चौकशी करण्यात आली होती. तसेच कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.

शनिवारी सकाळी तोफखाना पोलिस दराडे व झिरपे या दोघांना त्यांच्या राहत्या घरी घेऊन गेले. तेथे घरझडती घेण्यात आली. गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती हाती लागते का नाही, याची तपासणी करण्यात आली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर घरझडती पंचनामे करण्यात आले. 

या दोघांसह ठेकेदार सचिन लोटके हाही पोलिस कोठडीत होता. तिघांनाही दुपारी न्यायालयात नेण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने तीनही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. असलेकर यांनी काम पाहिले. न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर तिघांनाही उपकारागृहात नेण्यात आले.