Fri, Jul 19, 2019 01:36होमपेज › Ahamadnagar › भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त!

भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त!

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 2:03AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील ‘प्रभाग 32 ब’च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत आपले वर्चस्व कामय राखले. मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत पुढे असलेल्या शिवसेनेला मागे टाकत काँग्रेसने विजयावर शिक्कामोर्तब केले. शिवसेनेला या प्रभागात पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला असला तरी, त्यांच्या मतांमध्ये मात्र वाढ झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे विकासाच्या मुद्द्यावर स्वबळाचा नारा दिलेल्या भाजपावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे.

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विक्रमी 75 टक्के मतदान झाल्यामुळे शिवसेनेचे ‘होप्स’ वाढले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शिवाजीनगर शाळेतील 4 मतदान केंद्रांमधील मतांची मोजणी करण्यात आली. या पहिल्या फेरीत काँग्रेसला 1162 मते मिळाली. तर शिवसेनेने 1336 मते घेत काँग्रेसवर 174 मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर जगदंबा विद्यालयातील 3 मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी करण्यात आली. यात शिवसेनेला 550 मते मिळाली. तर काँग्रेसने 1178 मते घेऊन 628 मतांची मोठी आघाडी घेतली. काँग्रेसने या निवडणुकीत 2340 मते मिळवत शिवसेनेवर (1886 मते) 454 मतांनी विजय मिळविला. मागील सार्वत्रिक निवडणुकीत याच प्रभागात शिवसेनेला सुमारे 1350 मते मिळाली होती. यंदा या मतांमध्ये सुमारे 500 मतांची वाढ झाल्याचे चित्र आहे. शिवाजीनगर मतदान केंद्रावर मतदान असलेल्या परिसरात शिवसेनेने मतदारांना आपलेले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगदंबा विद्यातील मतदान केंद्रावर असलेल्या मतदारांनी काँग्रेसला ‘विशाल’ साथ दिल्यामुळे शिवसेनेला ‘विजय’ गमवावा लागला.

दुसरीकडे भाजप उमेदवाराला एकाही मतदान केंद्रावर 35 चा आकडा पार करता आला नाही. 15, 17, 18, 34, 17, 28 व 27 अशी सात केंद्रांवर मिळून केवळ 156 मते भाजपाच्या पारड्यात पडली. मतदान केंद्रावर बुथ नसणे, एका कार्यकर्त्याचा अपवाद वगळता मतदानाच्या दिवशी उमेदवाराला एकट्यालाच फिरण्याची वेळ येणे, यापाठोपाठ पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्कीही भाजपावर ओढावली आहे. काँग्रेस व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व पर्यायाने आ. संग्राम जगताप यांची साथ घेत, प्रभागातील वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळविले. शिवसेनेला पराभव स्वीकाराला लागला असला तरी त्यांच्या मतांमध्ये झालेली वाढ आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसला गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. तर स्वतंत्र डरकाळी फोडणार्‍या भाजपला केडगावात मात्र शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचेही या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

Tags  : Ahmadnagar, Deposit, BJP, candidate, seized