होमपेज › Ahamadnagar › पद्मभूषण विखेंना हीच खरी श्रद्धांजली 

पद्मभूषण विखेंना हीच खरी श्रद्धांजली 

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:40AM

बुकमार्क करा

देवळाली प्रवरा  : वार्ताहर      

पद्मभूषण खा. बाळासाहेब विखे पाटील यांची राहुरीचा बंद कारखाना सुरू व्हावा, हीच इच्छा होती. परिवर्तन मंडळाने अनेक अडचणींवर मात करून हा कारखाना सुरू केला व आज या कारखान्याच्या साखर पोत्यांचे पूजन केल्याने हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केले. डॉ.तनपुरे कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाच्या पहिल्या 11 साखर पोत्यांचे पूजन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक नामदेवराव ढोकणे, शिवाजीराजे गाडे, केशवराव मा. पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. 

डॉ.  विखे म्हणाले की, प्रयत्नांची पराकाष्टा करून कारखाना आम्ही सुरू केला आहे.  प्रतिदिन 2500 ते 2600 मे. टनांपर्यंत कारखाना ऊस गाळप करीत आहे.  थोड्याच दिवसांमध्ये ऊसाच्या तोडीमध्ये वाढ केली जाईल. सभासद शेतकर्‍यांनी त्यांच्या  उसाची काळजी करू नये.  मात्र, ऊसतोड णीही नियोजनाप्रमाणेच केली जाईल. जनतेने मोठ्या विश्‍वासाने परिवर्तन मंडळाकडे कारखान्याची सत्ता दिली आहे. मोठा संघर्ष करून आम्ही तो चालू केला. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची हा कारखाना सुरू व्हावा, हीच इच्छा होती. सर्व गोष्टी जुळत आणत आम्ही निवडणुकीत सभासदांना दिलेला शब्द पाळला आहे. आता कारखाना सुरू ठेवण्याची जबाबदारी सभासद कामगारांची आहे.  

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे,उत्तमराव आढाव, बाळकृष्ण कोळसे, सुरसिंगराव पवार, महेश पाटील, नंदकुमार डोळस, विजय डौले, रवींद्र म्हसे, शिवाजी सयाजी गाडे, कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे आदी संचालक व सभासद, कामगार उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याचे सभासद संजय म्हसे, बाबासाहेब दारकुंडे, भाऊसाहेब गटकळ, भागवतराव कोळसे, गणेशराव भांड, बबनराव कोळसे, ज्ञानदेव आहेर आदी उपस्थित होते. उदयसिंह पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.