Thu, May 23, 2019 04:47होमपेज › Ahamadnagar › निकालाअगोदरच मागवा उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी!

निकालाअगोदरच मागवा उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी!

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 11:33PMनगर : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन वर्षीय ‘एलएलएम’ अभ्यासक्रमाचा निकाल लागण्याअगोदरच फोटोकॉपी मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा अजब प्रकार शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा ठरला आहे. विधी शाखेतील दोन वर्षीय पदव्युत्तर पदवीच्या (एलएलएम) निकालाची काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे. अजून निकाल लागलेला नाही. मात्र, शुक्रवारपासूनच (दि. 6) उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी आवश्यक असलेल्या फोटोकॉपीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातून निकालाआधीच फोटोकॉपी मागण्यास सुरुवात करणार्‍या पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. निकाल लागलेला नसल्याने विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी ऑनलाईन अकाऊंट करावे लागत आहे.

ऑनलाईन अर्ज केल्यावर कोणत्या विषयाला किती गुण मिळाले हे दिसत आहे. निकाल जाहीर नसल्याने विद्यार्थ्यांनी गुण पाहण्यासाठी हीच शक्कल लढविली आहे. मात्र, ‘एलएलएम’ अभ्यासक्रमात 50:50 फॉर्म्यूला आहे. काही विषयांच्या प्रत्येकी 50 गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाते, तर 50 गुण महाविद्यालयाकडे असतात. तसेच काही विषयांचे संपूर्ण गुणच महाविद्यालयाकडे असतात. निकालच जाहीर झालेला नसल्याने महाविद्यालयांकडून किती गुण देण्यात आले, हे विद्यार्थ्यांना समजू शकले नाही. विद्यापीठाच्या परीक्षेच्या फोटोकॉपी मागविता येत असल्याने फक्त 50 पैकी किती गुण मिळाले, हे समजत आहे. संपूर्ण गुण समजत नसल्याने नेमकी किती टक्के गुण मिळाले, हे स्पष्ट होत नाही.

पुणे विद्यापीठाच्या या अजब कारभारामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. ऑनलाईन फोटोकॉपी मागविण्याची प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत. तरीही विद्यापीठाने अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही. निकाल लागण्याअगोदरच फोटोकॉपी मागविण्याची प्रक्रिया सुरू करून विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या निष्काळजीपणाचा अजब नमुना दाखविला आहे.

परीक्षा नियंत्रकच अनभिज्ञ

‘एलएलएम’च्या निकालाबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्या संपर्क साधला असता, ते या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. निकालाअगोदरच फोटोकॉपीची प्रक्रिया कशी सुरू होऊ शकते, असा उलट प्रश्‍न करून चव्हाण यांनी सध्या सुट्टीवर असल्याचे सांगितले. कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.