होमपेज › Ahamadnagar › फायर स्टेशनसाठी १ कोटी देण्याची मागणी

फायर स्टेशनसाठी १ कोटी देण्याची मागणी

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 23 2017 10:39PM

बुकमार्क करा

श्रीरामपूर :  प्रतिनिधी

श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण जयंत ससाणे यांनी नुकतीच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्रीरामपूर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेकामी चर्चा केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी तात्काळ विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपरिषदेमध्ये माजी आ. जयंतराव ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 वर्षांपासून विविध योजना यशस्वीरित्या राबविल्याने जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्र राज्यात विकासाबाबत अग्रगण्य म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचा नावलौकीक आहे.  शहरात सुमारे 1 लाखाच्या आसपास लोकसंख्या असून शहराच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने अद्ययावत फायर स्टेशन उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी, तसेच नगरपरिषदेच्या हद्दीतील शिवाजी चौक ते गोंधवणी गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने सदरच्या अडीच किलोमीटर रस्त्यासाठी डांबरीकरण (हायवे ट्रीटमेंट) करण्यासाठी 2.5 कोटी रुपये आणि श्रीरामपूर नगरपरिषदेने खेळाडूंसाठी उभारलेल्या क्रीडा संकुलाच्या प्रलंबित कामांसाठी सुमारे 2 कोटी इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

यावर फडणवीस यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना तात्काळ श्रीरामपूर नगरपरिषदेकरिता सदर निधी उपलब्ध होण्याकामी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे नगरपरिषदेला अद्ययावत फायर स्टेशन, गोंधवणी रोड, क्रीडा संकुलासाठी निधी लवकरच उपलब्ध करून देणेकामी पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागाला आदेश देण्यात आले असल्याची माहिती ससाणे यांनी दिली. यावेळी आ. शरद रणपिसे, बाजार समितीचे सभापती सचिन गुजर उपस्थित होते.