Tue, Sep 25, 2018 01:44होमपेज › Ahamadnagar › रोजगार हमीचे काम सुरू करण्याची मागणी

रोजगार हमीचे काम सुरू करण्याची मागणी

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 21 2018 10:33PMपारनेर : प्रतिनिधी 

रोजगार हमी योजनेचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील पानोली येथील महिला मजुरांनी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या दालनाबाहेर काल (दि.21) ठिय्या आंदोलन केले. कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

मजुरांनी मागणी केल्यामुळे पानोली ग्रामपंचायतीने कवठा ते गायकवाडदरा व गाडेकरमळा ते गटेवाडी या दोन रस्त्यांच्या कामांची मागणी पंचायत समितीकडे केली होती. पाठपुराव्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी दोन्ही कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली. पुढे कार्यारंभ आदेशासाठीही बरीच प्रतीक्षा करावी लागली. 7 मे रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला, तो केवळ गाडेकरमळा ते गटेवाडी या कामाचा. दुसर्‍या कामाचा आदेश न मिळाल्याने इतर मजुरांच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला.

दोन्ही कामे बरोबरच सुरू करावीत, यासाठी पंचायत समितीकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र दाद न मिळाली नाही. काल मंजुरी मिळालेले काम सुरू करण्यात आल्यानंतर कवठा ते गायकवाडदरा कामासाठी नोंदणी केलेले मजूरही त्या कामावर आले. मात्र ऑनलाईन मस्टरवर या मजुरांच्या हजेरी लावता येणे शक्य नव्हते. 

हा पेच निर्माण झाल्यानंतर पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण गायकवाड, इंद्रभान गाडेकर, संतोष खोडदे, राजू गायकवाड, राजू जाधव, अंकुश गायकवाड, बाबई गावडे, संगीता ढोर यांच्यासह मजुरांनी पारनेरकडे कूच केली. टिकाव, फावडे तसेच घमेल्यांसह गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या दलनापुढे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. तासाभरानंतर गटविकास अधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दालनात पाचारण करुन आंदोलकांशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. कार्यारंभ आदेशाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका होती. तनपुरे यांनी कामाचा आदेश सुपूर्द केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.