होमपेज › Ahamadnagar › महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMसंगमनेर : प्रतिनिधी

दुसर्‍या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी, तसेच राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये समन्वय वाढावा, यासाठी काम करणार्‍या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयास राज्याचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट देऊन माहिती घेतली. यावेळी युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी आ. थोरात यांचा सन्मान केला. 

स्वित्झरलंडमधील जिनिव्हा या शहरात असलेल्या युनोच्या मुख्यालयात काल माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 10 आमदारांच्या शिष्टंडळाने भेट दिली. यावेळी युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी या शिष्टमंडळाबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

युनो ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था असून ती आंतरराष्ट्रीय शांतता, सलोखा, राष्ट्रा-राष्ट्रांत समन्वय, सलोखा, आंतरराष्ट्रीय कायदे, मानवाधिकाराचे संरक्षण आणि संवर्धन, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती या बाबींवर काम करते. स्विर्त्झलंडमधील जिनिव्हा शहरातील हे भव्य मुख्यालय असून आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय हवामान संस्था व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संपदा (पेटेंट), संयुक्त राष्ट्र संघातर्फे मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी विविध उपाय योजना सुरू असलेल्या प्रयत्नांचा व या संघटनांच्या कामाकाजांची माहिती आ. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली.
डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनीव्हा कार्यालयाचे महानिर्देशक आहेत. 38 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. त्यात निर्वासींचे पुनर्वसन कार्यक्रमाचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी या संस्थांच्या कामाची माहिती दिली.

आ. थोरात यांनी महाराष्ट्राची भौगोलिक, सामाजिक, औद्योगिक व आर्थिक परिस्थिती याबाबत माहिती देवून उद्योग जगतातील विविध शिखर संघटनांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रित केले. भारतातील समृद्ध लोकशाहीची रचना,  भारतीय राज्यघटना, भारतीय नागरीकांचे मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्य यांची माहिती दिली. तसेच गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची भौगोलिक अनुकूलताही या देशाच्या प्रतिनिधींना गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले. 

दरम्यान, राज्याच्या  विकासासाठी निश्‍चितच योगदान देणार असल्याचे युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी संकेत  दिले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी युनोने मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली आहे. 

दरम्यान, आ. थोरात यांनी आपल्या अभ्यासू कार्यप्रणालीतून राज्य, देश व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळविला असून साता समुद्रापार झालेल्या या दौर्‍यातील सन्मानामुळे संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.