Sun, Mar 24, 2019 17:21होमपेज › Ahamadnagar › तेरा नवरदेवांची फसवणूक

तेरा नवरदेवांची फसवणूक

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 11:30PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

बनावट लग्न जमविणारा मुख्य सूत्रधार जॅकी उर्फ बाळासाहेब पठारे (रा. दत्तनगर, ता.श्रीरामपूर) याला अटक केल्यानंतर आतापर्यंत त्याने पैसे घेऊन 13 विवाह लावून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी पाच नवरदेवांनी पोलिसात धाव घेऊन न झालेल्या लग्नाची कहाणी पोलिसांसमोर कथन केली आहे. यामध्ये कोपरगावचा एक व चाळीसगाव येथील चारजणांचा समावेश आहे. दरम्यान, काल आरोपी पठारे यास श्रीरामपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

याप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी यांनी सांगितले की, बनावट नवरी प्रकरणात फसगत झालेल्या पाच जणांनी काल पोलिसांत येऊन माहिती दिली आहे. यात चाळीसगाव भागातील रावसाहेब माळी, गोरक्ष माळी, कैलास महाजन, आनंद महादेव, तर कोपरगाव तालुक्यातील धोतरे येथील भगवान मलिक यांचा समावेश आहे. एकूण 13 जणांची अशी फसवणूक झाल्याचेही समोर येत आहे. बनावट नवरीचे हे रॅकेट नवरदेवांकडून नववधूसाठी लाखो रुपये व सोन्याचे दागिने घेत होते.  लग्नाच्या दुसर्‍यादिवशीच ही नवरी, कलवरी आईसह फरार होत असे. तसेच लग्न जमवताना बनावट दाखले देऊन वर मंडळीची दिशाभूल करीत होते. असे अनेक प्रकार समोर येत असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसात आरोपी प्रियंका रोकडे, अनिता रोकडे व मुख्य सूत्रधार बाळासाहेब पठारे यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघी आरोपी महिला या पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी 50 हजार रुपये सुरत, मालेगाव या भागात बनावट लग्न करुन फसवणूक केल्याचे तपासात समोर आले.दरम्यान, गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या अनेक नवरदेवांना या बनावट नवरीने गंडा घातल्याची चवीने चर्चा सुरू आहे.