Mon, Aug 19, 2019 13:21होमपेज › Ahamadnagar › झेडपीत विकासकामांचे विकेंद्रीकरण करा : वाकचौरे

झेडपीत विकासकामांचे विकेंद्रीकरण करा : वाकचौरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत सदस्यांना विकासकामांचे वाटप करताना दुजाभाव होत आहे. ठराविक जिल्हा परिषद गटातच कामे घेतली जात असून, विकासकामांचे विकेंद्रीकरण करावे. पदाधिकार्‍यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या जयपूर दौर्‍यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता तेलंगणा दौर्‍याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला.वाकचौरे म्हणाले की, निवडणुकीला तेरा महिने होऊन गेले. जिल्ह्यातील ठराविक भागातच विकास करायचा हे सत्ताधार्‍यांच्या डोक्यात आहे. प्रत्येक सदस्याला विकास कामाचे समान वाटप झाले पाहिजे. ठराविक गटातच विकास कामांना कोट्यावधी रुपयाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहेत. हा सत्ताधार्‍यांचा मनमानी कारभार चालू असून, तो खपवून घेतला जाणार नाही.

पदाधिकारी म्हणून सदस्यांपेक्षा थोडी जास्त कामे घेतली तर हरकत नाही. काही सदस्यांना एक रस्ता, चार हायमॅक्स एवढा निधी तर, पदाधिकार्‍यांना मात्र कोट्यवधींची कामे असा दुजाभाव होत आहे. अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतींना तीस हायमॅक्स, लाखो रुपयांचे रस्ते, पर्यटनाची कामे, बंधारे दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये निधी देण्यात आला आहे. सदस्यांना जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमीसाठी चार लाख रूपये तर, पदाधिकार्‍यांनी सुचविलेल्या स्मशानभूमीला मात्र आठ लाख रुपये, असा कारभार सुरु आहे. आता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तेलंगणा राज्यातील योजना पाहण्यासाठी सहलीला जाणार आहेत. त्यापेक्षा तो पैसा विकासकामांवर खर्च केला तर त्याचा सदुपयोग होईल.

50 कोटींचा निधी जाणार परत

मागच्या वर्षी अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे 49 कोटी आखर्चित निधी परत गेला. त्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. परंतु कारवाई तर नाहीच, उलट नव्या गाड्या त्या अधिकार्‍यांना दिल्या. ह्यावर्षी नियोजनाचा अभाव असून, 50 कोटींच्यावर निधी परत जाणार आहे. आता तरी ह्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, असेही वाकचौरे म्हणाले.

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, Decentralize, ZP, Development, Works, Wakchoure


  •