Mon, Jun 17, 2019 04:22होमपेज › Ahamadnagar › ‘सिव्हिल’च्या मुकादमाचा मृत्यू

‘सिव्हिल’च्या मुकादमाचा मृत्यू

Published On: May 31 2018 1:33AM | Last Updated: May 30 2018 10:38PMनगर : प्रतिनिधी

रात्रीच्यावेळी कर्तव्य बजावत असताना जिल्हा रुग्णालयातील मुकादमाचा हृदयविकाराच्या झटक्याने काल (दि. 30) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नसल्यामुळेच हा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयातील कामगारांनी केला आहे. त्यामुळे बुधवारी जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी नियुक्तीस असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कामगारांच्यावतीने आज (दि. 31) काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

ताराचंद गायकवाड (वय 55) हे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मुकादम गायकवाड यांना रात्रीपाळी होती. मंगळवारी रात्री त्यांची ड्युटी सुरू झाली. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत त्रास होऊ लागला. गायकवाड यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यासोबत ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांनी रात्रपाळीच्या डॉक्टरांना फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने पहाटे 4 वाजता गायकवाड यांचा मृत्यू झाला. 

इतर कर्मचार्‍यांना ही बाब समजताच त्यांनी सकाळीच जिल्हा रुग्णालय परिसरात कर्मचार्‍यांनी गर्दी केली. रात्रीच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी वेळेत उपचार न केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप कामगारांच्यावतीने करण्यात आला. कर्मचार्‍यांकडून बुधवारीच कामबंद आंदोलन केले जाणार होते. परंतु, जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यामुळे बुधवारचे आंदोलन स्थगित करण्यात आले. गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत.