Tue, Jun 25, 2019 15:39होमपेज › Ahamadnagar › गोबर गॅसच्या टाकीमध्ये गुदमरून बाप-लेकाचा मृत्यू

गोबर गॅसच्या टाकीमध्ये गुदमरून बाप-लेकाचा मृत्यू

Published On: Jan 12 2019 1:29AM | Last Updated: Jan 12 2019 1:29AM
श्रीगोंदा : प्रतिनिधी

गोबर गॅसच्या टाकीला जोडलेला पाईप दुरुस्त करण्यासाठी, टाकीत उतरलेल्या मुलासह त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचाही टाकीत गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी साडेचारच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील हिंगनी या गावात घडली.

अजित विष्णू वाखारे (वय 28) व विष्णू पोपट वाखारे (वय 55) अशी गुदमरून मृत्यू झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती की, विष्णू पोपट वाखारे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून गोबर गॅस आहे. या गोबर गॅसचा पाईप नादुरुस्त झाल्याने, अजित वाखारे हा गोबर गॅसच्या टाकीत उतरला होता. मात्र, गुदमरल्यासारखे झाल्याने काही वेळातच त्याने वडील विष्णू वाखारे यांना जोरात हाक मारली. बाजूलाच काम करत असलेल्या वडिलांनीही त्याला वाचविण्यासाठी लगेच टाकीत उडी घेतली. मात्र, टाकीत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने बाप-लेकाचा गुदमरून मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर बराच वेळ हे दोघे कुठे गेले, ते न समजल्याने घरातील मंडळी व इतर नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. गोबर गॅस टाकीच्या बाजूला चप्पल व मोबाईल दिसल्याने बांबूच्या साहाय्याने टाकीत शोध घेतला असता, अजित दिसून आला. त्यानंतर विष्णू वाखारे हेही दिसून आले. या दोघानांही बाहेर काढून तातडीने शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी या दोघांनाही मयत घोषित केले. विष्णु वाखारे यांना अजित हा एकुलता एक मुलगा होता. अजित याला एक मुलगा, एक मुलगी आहे. बाप- लेकाच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण हिंगनी गावावर शोककळा पसरली आहे.