Thu, Jun 20, 2019 07:15होमपेज › Ahamadnagar › मयत कर्मचार्‍यांचेही काढले पगार!

मयत कर्मचार्‍यांचेही काढले पगार!

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 11 2018 10:42PMनगर : प्रतिनिधी

पंचायत समितीत पूर्वी कार्यरत असलेल्या परंतु सेवानिवृत्तीनंतर कामावर नसलेल्या व मयत झालेल्या कर्मचार्‍यांच्या नावावर वेतन देयके काढण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी श्रीगोंदा व पारनेर येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, पंचायत समितीत पूर्वी तीन कर्मचारी कामाला होते. वास्तविक पाहता एखादा कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर शासनाच्या सेवार्थ प्रणालीतून त्याचे नाव कमी करणे आवश्यक होते. मात्र, या कामाची जबाबदारी असलेल्या कर्मचार्‍यांनी सेवार्थ प्रणालीतून मयत कर्मचार्‍यांचे नाव कमी केले नाही.

पारनेर पंचायत समितीतल्या लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक अशोक अंबादास पंडित व श्रीगोंदा पंचायत समितीच्या जे. डी. घोडके यांनी वेतन देयके देतांना या मयत कर्मचार्‍यांच्या नावे 1 लाख 76 हजार 668 रुपयांची रक्कम जमा केली. प्राथमिक चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.तसेच त्यांची विभागीय चौकशीही होणार आहे.

पंचायत राज सेवार्थ प्रणालीत स्तर 1 चा लॉगिन पासवर्ड गोपनीय ठेवणे बंधनकारक असतांना पंडित यांनी हा पासवर्ड तालुका स्तरातून घेतला. कार्यरत नसलेल्या कर्मचार्‍याच्या नावे जानेवारी 2018 ची देयके फेब्रुवारी 2018 मध्ये दिली. तसेच अतिप्रदानाची रक्कम खातेप्रमुखांची स्वाक्षरी न घेता स्वतः स्वाक्षरी करत चलनाने भरणा केली. या प्रकारात घोडके यांनी नियमबाह्य देयके दुसर्‍याकडून तयार करून घेतली. त्यामुळे दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन कारवाईच्या काळात पंडित यांना पारनेर पंचायत समिती तर घोडके यांना श्रीगोंदा पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले असून, गटविकास अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.अशा प्रकारे गंभीर अनियमितता असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असल्याने विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.