Thu, Aug 22, 2019 04:55होमपेज › Ahamadnagar › दराडे, झिरपेला जामीन मंजूर

दराडे, झिरपेला जामीन मंजूर

Published On: Mar 13 2018 1:40AM | Last Updated: Mar 12 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

मनपा प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप झिरपे या दोघांना न्यायालयाने काल (दि. 12) जामीन मंजूर केला. दोघांनाही महिन्यातून दोनदा तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची अट घातण्यात आली आहे.

महापालिकेतील पथदिव्यांच्या कामांत 34 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी दुपारी महापालिकेचे प्रभारी उपायुक्त दराडे, कॅफो झिरपे या दोघांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर शनिवारी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तसेच आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सोमवारी (दि. 12) मुख्य न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली होती.

सोमवारी सकाळच्या सत्रात तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांच्यावतीने लेखी म्हणणे सादर करण्यात आले. सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती लक्का म्हणाल्या की, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. कट रचून पद्धतशीरपणे हा गुन्हा करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील काही आरोपी अजून फरार आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. कामांच्या मूळ फायली गायब आहेत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. स्वरुप गंभीर स्वरुपाचे असून, आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.

आरोपींचे वकील म्हणाले की, सहाय्यक आयुक्त दराडे यांच्याकडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला होता. आरोपी झिरपे याने कामांच्या पूर्णत्व अहवालानंतर बिलांवर स्वाक्षरी आहे. त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 15 हजार रुपयांचा वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच आरोपींनी प्रत्येक 1 व 15 तारखेला तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी नोंदवावी, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशी अट घातली आहे.