होमपेज › Ahamadnagar › आवर्तनाअभावी फळबागांसह पिके धोक्यात

आवर्तनाअभावी फळबागांसह पिके धोक्यात

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 10:49PMश्रीगोंदाः प्रतिनिधी 

पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्याच्या क्षेत्रात कृषी सिंचनासाठी सोडण्यात येणारे रब्बी हंगामासाठी कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन दोन महिन्यांपूर्वी सोडण्यात आले होते. आता रब्बी हंगाम संपत आला असून,  अजूनही रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले नाही.

रब्बी  हंगामासाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय असताना पाणी सोडण्याच्या कुठल्याही प्रकारचा आदेश झाला नसल्याने तालुक्यातील उभ्या फळबागा  आणि रब्बी पिकांना   पाणी देण्यासाठी तातडीने कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. 

यंदा कुकडीच्या लाभक्षेत्रात येणारे पाचही धरणे शंभर टक्के भरले. तालुक्यातही सर्वदूर पाऊस पडल्याने मागील खरीप हंगामात एकच आवर्तन मिळाले होते. त्यात पुन्हा चालू रब्बी हंगामातही एकच आवर्तन मिळाले आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा अजून पन्नास टक्केच्या आसपास आहे. रब्बी हंगाम संपत आला तरी अजून पाणी सोडण्यात आले नाही.  हंगामातील दुसरे आवर्तन 28 फेब्रुवारीच्या आत सोडणे गरजेचे असताना कुकडी पाटबंधारे विभागाने अजून पाणी सोडले नसल्याने आता तातडीने हे आवर्तन सोडले नाही तर रब्बी हंगामात केवळ एकच आवर्तन मिळणार आहे. 

दि. 28 तारखेनंतर  सोडण्यात येणारे आवर्तन उन्हाळी हंगामात  धरले जात असल्याने यामुळे लाभधारक शेतकर्‍यांना रब्बीचे आवर्तन उन्हाळी आवर्तनात गेल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामाची वेगवेगळी पाणीपट्टी भरावी लागणार असल्याने हा शेतकर्‍यांचा आर्थिक तोटा होणार आहे. यामुळे एक आवर्तन कमी मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या उभ्या फळबागांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवणार असल्याने वेळेत पाणी मिळण्यासाठी पाण्याची उपलब्धता पाहून हे रब्बीचे आवर्तन होऊन अजून दोन आवर्तन होऊ शकतात. यामुळे तातडीने आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याची  मागणी भाजप नेते राजेंद्र म्हस्के यांनी केली  आहे.

कुकडी प्रकल्पात अठरा टीएमसी पाणी

कुकडी प्रकल्पात  सध्या अठरा टीएमसी म्हणजेच 60 टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्यावर्षी याच दिवशी चाळीस टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची आकडेवारी लक्षात घेता रब्बी आवर्तनाबरोबरच उन्हाळ्यात शेतीसाठी एक आणि पिण्यासाठी एक असे आवर्तन होऊ शकते.

तालुक्याचाही विचार करा

सध्या पुढील 2019 साली होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सत्ताधारी आणि विरोधक लागले आहेत. सभा,  मेळावे शक्तीप्रदर्शनाला नेते मंडळींनी सुरुवात केली असल्याने तालुक्याच्या महत्वाच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी नेतेमंडळीने घेण्याची गरज असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे.