होमपेज › Ahamadnagar › राहुरीत डेंग्यू सदृश आजाराने घबराट

राहुरीत डेंग्यू सदृश आजाराने घबराट

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 10:34PMराहुरी : प्रतिनिधी

तालुक्यात डेंगूसदृश आजारांनी थैमान घातले आहे. ग्रामीण भागासह शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. 
राहुरी शहरात नुकतेच 6 ते 7 रुग्ण डेंगूसदृश आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले होते. आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य, तसेच मान्सून काळात रिमझिम सरी कोसळत असल्याने डासांच्या उत्पत्तीला पूरक अशी वातावरण निर्मिती झाली आहे. यामुळे पाणी साठवणूक ठिकाणासह नाले व गटार सफाई, औषध फवारणी, कचर्‍याची व्यवस्थिती विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक भागांत अस्वच्छता  निर्माण झाली आहे. परिणामी, डेंग्यू सारख्या आजाराची लागण झालेले अनेक रुग्ण शहरात आढळले असतानाच ग्रामीण भागातही संशयित रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामुळे शहर भागासह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचेे चित्र दिसून येत आहे. 

मान्सून काळात आरोग्य विभागाकडून सांडपाण्याचा सर्व्हे, ठिकठिकाणी निर्माण झालेली डबके, पाणी साठवण व्यवस्था पाहणी करून आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनाची उपाययोजना केली जात होती. तसेच ज्या भागात घाणीचे साम्राज्य आहे, तेथे स्वच्छतेबाबत उपाययोजना करून औषध फवारणी केली जात होती. परंतु मान्सून प्रारंभ होऊनही राहुरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसताना स्थानिक स्वराज्य संस्थाही गंभीर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरानंतर ग्रामिण भागातूनही रुग्णांच्या रांगा शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लागल्याचे चित्र आहेत. पोटदुखी, ताप, खोकला, जुलाब आदींनी त्रस्त झालेले रुग्ण पाहता शहरासह ग्रामीण भागात आरोग्य विभागाने जागृत होऊन उचित उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

नुकतेच बारागाव नांदूर येथील एका व्यक्तिस डेंगू सदृश आजाराने ग्रासल्याचे समजताच आरोग्य विभागाची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. आरोग्य विभागाने बारागाव नांदूर भागातील पाहणी करताना ठिकठिकाणी निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य, साचलेल्या पाण्यांमुळे डासांची उत्पत्ती वाढल्याचे सांगत ग्रामपंचायत विभागाने स्वच्छतेबाबत पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकांमध्ये मात्र सर्वसामान्य व्यक्तिंना आजारपणाला सामोरे जावे लागत आहे. मानोरी, वांबोरी, टाकळीमिया, ताहाराबाद, सडे आदी गावांमधील अधिक रुग्ण खासगी रुग्णालयात विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. राहुरी भागात शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने ग्रामस्थांना आजारांचे निदान करण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेण्याखेरीज उपाय नसल्याने आजारपणासह मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही सहन करावी लागत  आहे. 

खासगी रुग्णालयांमध्ये लूटमार सुरूच

तालुक्यातील 96 गावांशी संलग्न असलेल्या राहुरी शहरात खासगी रुग्णालय चालकांची दुकानदारी जोमात आहे. राहुरी भागात रुग्णांना उपचारासाठी शासकीय सक्षम यंत्रणाच नसल्याने आजारांचे निदान करण्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे खासगी रूग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा वाढल्याचे पाहून काही खासगी रुग्णालय चालकांनी उपचाराच्या नावाखाली लूटमार सुरू केल्याचे चित्र आहे.