होमपेज › Ahamadnagar › दांडेकर, सुपेकर यांचे नगरसेवकपद रद्द

दांडेकर, सुपेकर यांचे नगरसेवकपद रद्द

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:51AMश्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका कुसुम धनंजय दांडेकर व गयाबाई मच्छिंद्र सुपेकर यांना जिल्हाधिकार्‍यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार  नगरसेवकपद रद्द  ठरवीले आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना  मोठा झटका बसला असून, विरोधकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मागील वर्षी नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे मनोहर पोटे व श्रीगोंदा विकास आघाडीचे फक्कड मोटे यांच्यात लढत झाली होती. यावेळी विकास आघाडीचे प्रमुख भरतकुमार नाहाटा यांनी आघाडीच्या दहा नगरसेवकांना व्हीप बजावला होता. मात्र सुपेकर व दांडेकर यांनी पोटे यांना मतदान करत पक्षादेशाला केराची टोपली दाखविली होती. यावरून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम 1986 चा आधार घेऊन भारतकुमार नाहाटा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. नाहाटा यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 16 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने दांडेकर व सुपेकर यांना नगरसेवकपद रद्द ठरविले आहे.

उच्च न्यायालयात दाद मागणार

या निर्णयाबाबत नगरसेविका गयाबाई सुपेकर म्हणाल्या, मी श्रीगोंदा नगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून आली आहे. भरत नाहाटा यांनी स्थापन केलेल्या श्रीगोंदा शहर विकास आघाडीची नोंदणी करताना आपण सही केली नव्हती. नाहाटा यांनी माझी खोटी सही करून मला आघाडीत घेतले  होते. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच शहर विकास आघाडी करताना आपली खोटी सही कोणी केली, यासंदर्भात तक्रार करणार आहे.