होमपेज › Ahamadnagar › पालकमंत्र्यांविरोधात दादा थोपटणार दंड

पालकमंत्र्यांविरोधात दादा थोपटणार दंड

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 17 2018 10:15PMजामखेड : मिठूलाल नवलाखा

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधी व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडून होणार्‍या चुकांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारीक लक्ष ठेवून आहेत.  अजितदादांनी जम बसविण्यास सुरूवात केली आहे. दादा हेच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे समजत असून,त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघ मागील तीन पंचवार्षिकला राखीव होता. त्यानंतर मतदारसंघ खुला झाला आणि आमदारकीचे अनेकांना डोहाळे लागले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा नेते उभे राहिले आणि मतविभागचीचा फायदा राम शिंदे यांना झाला. ओबीसी मतदार एकवटला व राम शिंदे दोनदा आमदार झाले आहे. तसे पाहता हा मतदार संघ पवारांना मानणारा होता. याला  खर्डा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने खिंडार पाडले आणि त्यानंतर राखीव विधानसभा निवडणुकीत तीन वेळा भाजपकडून सदाशिव लोखंडे आमदार झाले. त्यानंतर मतदारसंघ खुला झाला आणि दोन टर्मपासून राम शिंदे आमदारकी भोगत आहेत. मतदार संघाला शिंदे यांच्या रूपाने कधी नव्हे ते पालकमंत्री व कॅबनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे आता या दुष्काळी भागाचा चेहरा बदलला जाणार अशी आशा सर्वसामान्य माणसाला वाटू लागली. तसे या तालुक्यात पाणलोटाचे काम मोठे झाले आणि तालुका पाणीदार झाला. कृषी महाविद्यालय आले. या व्यतिरिक्त तालुक्यातील रस्ते झाले मात्र तेही निकृष्ट दर्जाचे. नेमके पाणी कुठे मुरले हे समजू शकले नाही.

आता चार वर्षे पूर्ण होत असताना जामखेड शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत. शहरातील विकास निधी आला पण निधीचा योग्य विनियोग होताना दिसत नाही. पहिल्या पावसात शहरातील सर्व भागात पाणी शिरले. यावर काही उपाय केले नाही. यामध्ये महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे आरोग्य सेवा. येथील सेवा म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. येथील  ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळत नाही. दररोज वाढणारे अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय किंवा अपघात कक्ष होणे आवश्यक आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केले. पालकमंत्री शिंदे यांना निवेदन दिले आहे. यावर मंत्र्यानी नियमांचा बागुलबुवा दाखवला. तसेच शहरातील टपरी धारकांचा प्रश्‍न देखील कळीचा मुद्दा आहे. कारण अतिक्रमण उठल्यावर यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. यावर पर्याय म्हणून नगर रस्तावर अनेक शासकीय जागा आहे. त्याठिकाणी शॉपीग सेंटर उभा राहू शकते पण याला राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. असे अनेक प्रश्‍न अनेक वर्षे झाले तरी सुटले नाही. मंत्र्याना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. 

या सर्व गोष्टींचा विचार करून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघाकडे विशेष असे लक्ष केंद्रित केले आहे.  पवार यांनी कर्जत तालुक्यात अंबालिका साखर कारखान्याच्या माध्यमातून पाय रोवले आहेत. तसेच जामखेड शहरातील राळेभात कुटुंबातील दोन तरुणांवर गोळीबार करण्यात आला होता. या दुहेरी हत्याकांडानंतर पालकमंत्री राम शिंदे राळेभात कुटुंबीयाला भेटायला देखील आले नाही परंतु अजित पवार यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली आणि दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना नोकरी देण्याची ग्वाही दिली, त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती  निर्माण होत आहे. या निमित्ताने पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारत परिस्थिती जाणून घेतली. या अगोदर त्यांचे पुतणे देखील येऊन गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते देखील येऊन गेले आहेत. या सर्व घटनांचा विचार करता पवारांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. 

धनगर समाजाच्या आरक्षणावरून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावरून देखील महाराष्ट्रभर समाज बांधवांमध्ये रोष निर्माण झाला आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी अनेक समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पालकमंत्री राम शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा फायदा विरोधी पक्ष किती उचलतात हे पाहावे लागेल.या घटनांबरोबर आठ दिवसात धनगर आरक्षण संदर्भात राजकीय वातावरण ढवळून निघाले. सर्व पक्षांनी आवाज उठविला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्याबाबत माहिती घेण्यासाठी उपनेते अनिल राठोड यांना पाठविले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. जामखेड येथील विनाअनुदानित कॉलेज मधील लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यामुळे खासगी संस्था चालकांचे धाबे दणाणले. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणजे भाजपा नेते सुरेश धस निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपचे नेते धस यांच्या स्वागतासाठी गेले होते. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत भाजपात दोन गट पडणार असून, याचा फटका ना. शिंदे यांना बसणार आहे.