Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Ahamadnagar › ‘अजय-अतुल’च्या अदाकारीवर रसिक खूश

‘अजय-अतुल’च्या अदाकारीवर रसिक खूश

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 20 2018 11:40PMनगर : प्रतिनिधी

‘लेक वाचवा’ अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या  सांस्कृतिक महोत्सवात गीत आणि संगीतकार अजय अतुल यांच्यासह इतर कलाकारांच्या अदाकरीवर नगरकर बेहत खूश झाले. कर्तृत्त्ववान महिलांच्या सन्मानासह जनसेवा    फाउंडेशन आणि  कलाकारांनी लाखो रसिकांना दिलेला ‘बेटी बचाव’ चा संदेश या कार्यक्रमाचे वेगळेपण दाखवून देणारा ठरला. 

युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नगरच्या वाडिया पार्कच्या प्रांगणात या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी लोणी येथे असा महोत्सव आयोजित करून फाउंडेशनने सामाजिक दायित्त्व जोपासले होते. यंदा नगरमध्ये हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून फाउंडेशनने पुन्हा एकदा ‘लेक वाचवा’ अभियानाचा जागर करण्यात आला. 

जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी रुबल अग्रवाल, अंजली देवकर वलाकट्टी, वर्षा गाढवे, अंजली, नंदिनी गायकवाड, अनुराधा ठाकूर, शेख शकिला, अ‍ॅड. निर्मला चौधरी, डॉ.सिमरनकौर वाधवा, तेजस्विनी सातपुते, कविता आव्हाड, डॉ.विमल ढेरे, शर्मिला भोसले यांना शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे  मकरंद अनासपुरे व सई ताम्हणकर यांनी आपल्या अस्सल ग्रामीण ढंगात उपस्थित रसिक प्रेक्षकांशी निवेदक म्हणून संवाद साधत नगरच्या भूमीची वैशिष्ट्ये व या महोत्सवाचा सामाजिक उद्देश विषद केला. अभिजित सावंत, स्वप्निल बांदोडकर, योगिता गोडबोले, बेला शेंडे यांच्या गाण्यातून या मैफलीला सुरूवात करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे यांचा नृत्याविष्कार नगरकरांना ठेका धरायला लावणारा होता. 

मैफलीच्या मध्यंतरी अजय अतुल यांचे प्रत्यक्ष रंगमंचावर आगमन झाले.मराठीला साता समुद्रापार नेऊन ठेवणार्‍या या जोडगोळीने आपल्या गायकीने लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले. मागील काही वर्षांत गाजलेली रसिकांच्या ओठावरली गाणी म्हणत अजय-अतुल यांनी  नगरकरांची  दाद मिळवली. 

या महोत्सवाचे संयोजक डॉ.सुजय विखे पाटील यांना  व्यासपीठावर बोलावून अजय अतुल यांच्यासह मकरंद अनासपुरे व सई ताम्हणकर यांनी दिलखुलास संवाद साधला. जनसेवा फाउंडेशनच्या कार्याची माहिती सांगतानाच सामाजिक बांधिलकीचे फाउंडेशनचे काम सुरू असल्याचे डॉ.विखे पाटील यांनी सांगितले. लेक वाचवा अभियानाचा जागर यापुढेही अजय-अतुल आणि मराठी कलावंतांच्या उपस्थितीत होतच राहील, असे नमूद करून तरुणांनी संयमाने राजकीय सामाजिक वाटचालीत काम करण्याचा संदेश डॉ.विखे यांनी या संवादातून दिला. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजय-अतुल यांच्यासह सर्वच कलाकारांचे स्वागत करून या कलाकारांनी नगरकरांना याड लावलयं, असा खुमासदार उल्लेख केला. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले काम आम्हांला प्रेरणा देणारे आहे. यामुळे 208 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना जनसेवा फाउंडेशनने सहकार्याचा हात दिल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.   या वेळी आ.बाळासाहेब मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.