Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये क्रूड बॉम्बचा स्फोट

नगरमध्ये क्रूड बॉम्बचा स्फोट

Published On: Mar 22 2018 1:38AM | Last Updated: Mar 22 2018 1:38AMनगर : प्रतिनिधी

शहरातील माळीवाडा भागातील कुरिअर दुकानात पार्सलमधील रेडिओत बसविलेल्या क्रूड बॉम्बचा स्फोट होऊन दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हे पार्सल पुण्यातील सरहद्द संस्थेचेे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने होते. परंतु, हा बॉम्ब नगरमध्येच मंगळवारी (दि. 20) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फुटला. नहार हे काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने, त्यांना हे कुरिअर पाठविण्यामागे दहशतवादी संघटनेच्या घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. 

या स्फोटात संजय मच्छिंद्र क्षीरसागर, संदीप बापूराव भुजबळ (दोघे रा. खळेवाडी, भिंगारनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच नगर पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकासह इतर गुप्तचर यंत्रणांकडूनही तपास सुरू करण्यात आला आहे. काही केंद्रीय पथकेही नगरला दाखल झाली आहेत. ‘फॉरेन्सिक’च्या पथकाकडून घटनास्थळावरील नुमने घेण्यात आलेले आहेत. गावठी बॉम्बमध्ये वापरला जाणारा स्फोटक पदार्थ यात वापरल्याचा संशय आहे. त्या पार्सलमधील एक चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली आहे. 

कोणावर संशय आहे का, याबाबत नगर पोलिसांच्या एका पथकाने नहार यांच्याकडे विचारपूस केली. एकूण 8 विशेष पोलिस पथके आरोपींच्या शोधात आहेत. कुरियर आणून देणार्‍या संशयिताचे रेखाचित्रही जारी करण्यात आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.20) दुपारी तीन वाजता माळीवाडा भागातील मारुती कुरियर येथे एक व्यक्ती पार्सल घेऊन आली. कुरियर दुकानात कामाला असलेल्या आश्‍विनी पटेकर नावाच्या युवतीने हे पार्सल स्वीकारले. नगरच्या एका तरुणीने पुण्यातील सरहद्द संघटनेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने हे पार्सल दिलेले होते. त्यात नहार यांच्या घरचा पत्ता व मोबाईल क्रमांकही होता. त्यानंतर सदर व्यक्ती तेथून निघून गेली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या पार्सलमधून कसलातरी आवाज येऊ लागला. त्यामुळे दुकानात कामाला असलेल्या संजय क्षीरसागर यांनी ते पार्सल उघडून पाहिले. आतमध्ये एक चिठ्ठी व रेडिओ संच होता. नजमा शेख नावाच्या तरुणीच्या नावाने संजय नहार यांच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी वाचून, उत्सुकतेपोटी क्षीरसागर यांनी तो रेडिओ चालू करण्यासाठी दुकानातील इलेक्ट्रिक बोर्डला पीन लावली. ही पीन लावताच अचानक स्फोट झाला. यात क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले व त्यांच्यासोबत कुरियर मालकाचे बंधू संदीप भुजबळ हेही जखमी झाले. 

कुरियर दुकानात अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील रहिवाशांनी या दुकानाकडे धाव घेतली. तेथे स्फोटात जखमी झालेले दोनजण दिसले. दुकानाच्या पायर्‍यांवर रक्त सांडलेले होते. दोन्ही जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने आनंदऋषी रुग्णालयात हलविण्यात आले. ही माहिती समजताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, अभय परमार आदींसह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दहशतवाद विरोधी पथक, गुप्त वार्ता विभाग, ‘आयबी’सह बॉम्बशोधक पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही तेथे धाव घेतली. 

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली असता पार्सल पाठविणारी नजमा शेख नावाची व्यक्ती अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. हे पार्सल संजय नहार यांच्या नावाने असल्याने पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणेची कसोटी लागली आहे. पोलिसांनी पार्सल घेऊन येणार्‍या व्यक्तीचे रेखाचित्र जारी केले आहे. त्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. काश्मिर खोर्‍यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या नहार यांच्या नावाने पार्सल पाठवून त्यांच्या घातपाताचा प्रयत्न यामागे असल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्या पार्सलमधील बॉम्ब नगरमध्येच फुटल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रशिक्षितांनी बनविला बॉम्ब! 

प्रथमदर्शनी हा क्रूड बॉम्ब असल्याचे आढळून आलेले आहे. ‘फॉरेन्सिक’कडून स्फोटानंतर आढळलेल्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. त्यानंतरच स्फोटासाठी नेमका कशाचा वापर केला, हे स्पष्ट होईल. रेडिओ बसविलेला हा बॉम्ब प्रशिक्षित व्यक्तीने बनविल्याचे उघड होते. यामागे दहशतवादी कारवाई, वैयक्‍तिक दुश्मनी अथवा इतर कोणता हेतू आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. काही जणांची चौकशी सुरू आहे. संशयिताचे रेखाचित्रही जारी केले आहे.

 -विनय चौबे (विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)

...असा बनविला बॉम्ब!

गावठी बॉम्ब बनविण्यासाठी वापरला जाणारा स्फोटक पदार्थ एका दीड ते दोन इंच आकाराच्या नळीत टाकण्यात आला होता. त्यात दोन्ही बाजूंनी वायरिंग करून त्याचे कनेक्शन रेडिओच्या बटणाला जोडलेले होते. त्यामुळे रेडिओमध्ये विद्युत प्रवाह येताच बॉम्बचा स्फोट होतो. त्या रेडिओसोबत नहार यांना नजमा शेख (बनावट नाव) या तरुणीने लिहिलेली चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत ‘तुम्ही मला शिक्षण देऊन मोठे केले. त्यामुळे तुमचे आभार मानण्यासाठी एक संदेश पाठविला आहे. तो संदेश ऐकावा’, असा विनंतीवजा मजकूर होता.

नहार पूर्वीपासून अतिरेक्यांच्या रडारवर

सरहद्द संस्थेचेे अध्यक्ष संजय नहार हे काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ते काही वर्षांपासून काश्मीर खोर्‍यातील अतिरेक्यांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात होते. रेडिओ बॉम्बद्वारे नहार यांच्या घातपाताचा प्रयत्न अयशस्वी  झाला असला तरी या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे.