Sun, Mar 24, 2019 16:55होमपेज › Ahamadnagar › अनधिकृत बांधकामांवर फौजदारी!

अनधिकृत बांधकामांवर फौजदारी!

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 10:26PMनगर : प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत आहे. यात बांधकामे नियमित करुन न घेणार्‍यांवर महापालिका अधिनियम व नगररचना अधिनियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काल आढावा घेवून शहरातील डॉक्टर व आर्किटेक्ट इंजिनिअर संघटनेच्या पदाधिकार्‍यांशीही चर्चा करुन कारवाईचा इशारा दिला आहे.

शासनाने बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी नियम शिथिल करत मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. मनपा प्रशासनाने त्यानुसार अधिसूचना प्रसिध्द करुन प्रस्तावही मागविले आहेत. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या पुढाकारातून काल शहरातील रुग्णालयांचे संचालक, डॉक्टर संघटना, आर्किटेक्ट संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. मनपाचे अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष धोंगडे यांनी शासनाच्या निर्णयाची व सवलतींची माहिती दिली. शहरातील अनधिकृत रुग्णालयांवरील कारवाई सध्या स्थगित आहे. शासनाने दिलेल्या संधीचा लाभ घेवून त्यांनी बांधकामे नियमित करुन घ्यावीत. त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.

बांधकामे नियमित करतांना आकारले जाणारे दंडात्मक शुल्क अवाजवी असल्याचे म्हणणे यावेळी संघटनांकडून मांडण्यात आले. मात्र, मनपाकडून आकारले जात असलेले शुल्क हे शासनाने निश्‍चित केलेले आहे. यात महापालिका प्रशासनाला बदल करण्याचे कुठलेही अधिकार नाहीत. तसेच पुढील काळात पुन्हा अशी संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मनपाकडून निदर्शनास आणून देण्यात आले. शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांनी संधीचा फायदा घेवून तसे प्रस्ताव महापालिकेकडे सादर करावेत. नियमानुसार बांधकामे नियमित केली जातील. बांधकामे नियमित करुन न घेणार्‍यांवर मुदतीनंतर कारवाई सुरु करण्यात येईल. कायद्यानुसार नोटिसा बजावून फौजदारी स्वरुपाचे गुन्हेही दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे.