Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Ahamadnagar › आत्महत्येप्रकरणी वाळके बंधूंविरुद्ध गुन्हा

आत्महत्येप्रकरणी वाळके बंधूंविरुद्ध गुन्हा

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:12PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

तारकपूर परिसरातील उद्योजक बलराज आत्माराम बठेजा (वय 58) यांच्या आत्महत्येप्रकरणी पवन वाळके व त्याच्या भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 17 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. मयताच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार केलेली नव्हती. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी सरकारी फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बलराज बठेजा यांच्यासह पवन वाळके व त्याच्या भावाने त्यांच्या शीतल इंडस्ट्रिज या फर्मच्या मोकळ्या जागेत बांधण्यात आलेले शेड भाड्याने दिले होते. त्यापोटी एक लाख रुपयांचा भरणा झालेला होता. ठरल्याप्रमाणे ते 17 डिसेंबर 2017 रोजी करार करणार होते. परंतु, काही कारणास्तव करार करावयाचा नाही, असे बठेजा यांनी ठरविले होते. मात्र, वाळके बंधूंनी करार रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे बठेजा यांचा मानसिक कोंडमारा होऊ लागला. त्यांनी हा प्रकार कोणाला सांगितला नाही. बठेजा यांनी शीतल इंडस्ट्रिजच्या लेटरपॅडवर 17 डिसेंबर 2018 रोजी चिठ्ठी लिहून इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली होती. 

बठेजा यांनी आत्महत्या का केली, हे त्यांचे नातेवाईक व इतर साक्षीदारांना माहीत नव्हते. 13 साक्षीदारांनी वाळके बंधूंविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. परंतु, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी सरकारी फिर्याद दाखल केली. उपनिरीक्षक सोने यांच्या फिर्यादीवरून पवन वाळके व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.