Thu, Apr 25, 2019 08:03होमपेज › Ahamadnagar › पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:21PMनगर : प्रतिनिधी

पोलिस उपनिरीक्षक सुभाष वाघेला यांच्यासह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगारमधील युवकाला दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 16 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष नानजी वाघेला, दीपक सुभाष वाघेला (दोघे रा. प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार), अभिलेख धमेंद्र वाघेला (रा. नेहरू कॉलनी, भिंगार) यांचा समावेश आहे. महेश ओमप्रकाश कंडोरे (रा. शाहू महाराज हौसिंग सोसायटी) हे मयताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, महेश कंडोरे यांना 20 मार्च 2018 रोजी अभिलेख वाघेला व दीपक वाघेला यांनी विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच जिवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुभाष वाघेला यांनी पुन्हा धमकावल्यामुळे महेश हे तणाव व दबावाखाली होते. मानसिक दबावात महेश कंडोरे यांनी 16 एप्रिल रोजी रात्री साडेसात ते पावणेअकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

उपनिरीक्षक वाघेला, त्यांचा मुलगा व पुतण्याकडून झालेली मारहाण, धमकीमुळे मानसिक दबावातून महेश कंडोरे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मयताचे भाऊ दीपक ओमप्रकाश कंडोरे यांनी दिली. त्यावरून भिंगार कँप पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करीत आहेत.