Fri, Nov 16, 2018 04:27होमपेज › Ahamadnagar › मिरवणुकीतील बँड बंद केल्यावरून हाणामारी

मिरवणुकीतील बँड बंद केल्यावरून हाणामारी

Published On: May 18 2018 1:14AM | Last Updated: May 17 2018 10:52PMजामखेड : प्रतिनिधी

जयंती मिरवणुकीतील बँड वाजविण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. यावरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  एका गटाने अ‍ॅट्रॉसिटीसह मारहाणीचा, तर दुसर्‍या गटाने मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक होेऊन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खर्डा येथील शिवाजी नामदेव पैठणपगार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 14 मे रोजी जयंती मिरवणुकीत बँड वाजविण्याची सुपारी घेतली होती. सायंकाळी 6 ते 10 दरम्यान हा कार्यक्रम होणार होता. रात्री दहाच्या सुमारास मिरवणूक जयहिंद चौकात आली. 

वेळ संपल्याने बँड वाजवणे बंद केले. वाद्य वाजवणे बंद झाल्यामुळे मिरवणुकीतील आकाश सुर्वे, काका (पूर्ण नाव माहीत नाही), पप्पू वाळसकर, बबलू गोलेकर या चार आरोपींनी तू बँड का बंद केला ? तू तुझे बँड वाजवण्याचे काम कर. आम्हाला नाचायचे आहे, असे म्हणत दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली. आरोपी आकाश सुर्वे याने फायटर तोंडावर मारुन जखमी केले. शुभम पैठणपगार हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता, त्याला धारदार शस्त्राने जखमी केले.

याप्रकरणी दुसरी फिर्याद अशोक नामदेव शिंदे (रा. सुरवेवाडी, खर्डा) यांनी दिली असून, त्यात म्हटले आहे की, 14 मे रोजी रात्री दहा वाजता आरोपी शहाजी पैठणपगार, शिवाजी पैठणपगार, कालिदास पैठणपगार, शुभम पैठणपगार, चिंटू पैठणपगार, राहुल सदाफुले (सर्व रा. खर्डा) हे खर्डा बसस्थानकासमोरील माझ्या दुर्वा पान दुकानात आले. त्यांनी दमदाटी करून लोखंडी गजाने, तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चेन व पान टपरीतील रोख रक्कम, असा एकूण 45 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाची दखल घेऊन पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच शांततेचे आवाहन केले. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.