Wed, Jan 23, 2019 17:53होमपेज › Ahamadnagar › छिंदमला कुठेही हजेरी देण्याची कोर्टाची मुभा!

छिंदमला कुठेही हजेरी देण्याची कोर्टाची मुभा!

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 10:09PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर करताना न्यायालयाने श्रीपाद छिंदम याला दर रविवारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची अट घातली होती. परंतु, पत्नीच्या विनंती अर्जानंतर न्यायालयाने त्याला वास्तव्याच्या परिसरातील कोणत्याही पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची मुभा दिली आहे.

अटकेनंतर काही आठवडे नाशिक रोड कारागृहात असलेल्या छिंदम याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने दर रविवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची अट घातली होती. परंतु, तो हजेरीसाठी नगरला आल्यास जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वास्तव्य असलेल्या जवळच्या कोणत्याही पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज छिंदम याच्या पत्नीने न्यायालयात केला होता. त्यावर न्यायालयाने शनिवारी (दि. 17) तपासी अधिकार्‍यांचे म्हणणे मागविले होते. शनिवारी पोलिसांच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी म्हणणे सादर केले. त्यानंतर न्यायालयाने छिंदम याला त्याचे वास्तव्य असलेल्या जवळच्या कोणत्याही पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची मुभा दिलेली आहे. 

नाशिक रोड कारागृहातून बाहेर आल्यापासून श्रीपाद छिंदम हा अज्ञातस्थळी आहे. त्याच्या वास्तव्याबाबत कोणाला निश्‍चित माहिती नाही. मात्र, तो दक्षिण भारतातील एका राज्यात गेल्याची जोरदार चर्चा आहे.