Sun, Aug 25, 2019 08:53होमपेज › Ahamadnagar › बनावट जामीन करणारे संपूर्ण राज्यात रॅकेट!

बनावट जामीन करणारे संपूर्ण राज्यात रॅकेट!

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:33PMनगर : प्रतिनिधी

नगरच्या न्यायालयात बनावट ऐपत दाखला सादर करून जामीन घेतल्याच्या तपासातून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नगरच नव्हे, तर कर्जत, राहुरी, लातूर येथील न्यायालयांचीही फसवणूक केल्याची कबुली आरोपी राजेंद्र वामनराव जगताप (रा. येरवडा, पुणे) याने पोलिस चौकशीत दिली आहे. तो फजल खान (रा. पुणे) याच्यासाठी काम करीत असून, तो रॅकेटचा म्होरक्या आहे. राज्यभर अशा पद्धतीचे रॅकेट चालवत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.

नगर जिल्हा व सत्र न्यायालयात राजेंद्र जगताप याने गौतम अण्णासाहेब वर्पे (रा. संगमनेर) या आरोपीचा बनावट ऐपत दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, प्रतिज्ञापत्र सादर करून जामीन घेतला होता. 

फसवणूक झाल्याचा प्रकार न्यायालय प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली व त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे हे करीत आहेत. त्यांनी दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी केली असता, आरोपी जगताप याने पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. नगरचे न्यायालयच नव्हे, तर राहुरी, कर्जत व लातूर येथील न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून जामीन केल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे. 

जगताप हा फजल खान याच्यासाठी काम करीत होता. त्यामुळे या गुन्ह्यात खान यालाही आरोपी करण्यात आले आहे. तो राज्यातील अनेक ठिकाणी न्यायालयात तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचा ऐपत दाखला, रेशनकार्ड व इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयात जामीन करून देतो. या टोळीचे राज्यभरात रॅकेट चालते. या गुन्ह्यात फजल खान याला अटक केल्यानंतर थेट न्यायालयांनाच फसविणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.