होमपेज › Ahamadnagar › स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध

स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 10:58PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. शिक्षणक्षेत्राची खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु असून,  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या विधेयकास विरोध दर्शविला आहे. या धोरणाविरूद्ध तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

येथे शिक्षक परिषदेची सहविचार सभा नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. सुनिल पंडीत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रात्रशाळा प्रमुख प्रा.सुनिल सुसरे, ग्रामिणचे अध्यक्ष शरद दळवी, सचिव तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सुरेश विधाते, सुलभा कुलकर्णी आदिंसह जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.

या कायद्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या राज्यात शाळा सुरू करणार आहेत. सीएसआर निधी वापरून कंपन्या शाळा करू शकणार आहेत. काही अटी आणि शर्तींवर खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. 

कायद्यातील या सुधारणेमुळे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या सामाजिक संस्थाबरोबरच खाजगी कंपन्यांनाही आता शैक्षणिक संस्था सुरु करता येतील. यामुळे कंपन्या पैसा कमविण्याच्या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात उतरतील व सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील.