Sat, Aug 24, 2019 21:13होमपेज › Ahamadnagar › कापूस उत्पादकांना मिळाला दिलासा

कापूस उत्पादकांना मिळाला दिलासा

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 24 2018 11:26PMनगर : प्रतिनिधी

बोंडअळीने जिल्ह्यातील कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना शासनाने आता दिलासा दिला आहे. 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आता सरसकट नुकसानभरपाई मिळणार असल्याचा अध्यादेश नुकताच शासनाने जारी केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील 1 लाख 97 हजार 342 बाधित शेतकर्‍यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा पाऊसपाणी मुबलक झाल्याने जिल्हाभरात 1 लाख 50 हजार 379 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. कापसाचे पीक जोमात असतानाच  बोंडअळीने या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीचा फटका 1 लाख 42 हजार 735 हेक्टर क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे 1 लाख 97 हजार 342 शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 157 कोटी 23 लाख रुपये अनुदानाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. अनुदान उपलब्ध होणार असल्याने बाधित शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण पसरले होते. 

दरम्यान, शासनाने मध्यंतरी आदेश काढून बाधित शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हाभरातील फक्‍त कोपरगाव, पोहेगाव, रवंदे, दहेगाव बोलका, सुरेगाव, जामखेड व खर्डा या महसुली मंडलांतील फक्‍त  9 हजार 4 26 शेतकर्‍यांनाच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे जाहीर केले. शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकर्‍यांत असंतोष पेटला. 

लोकप्रतिनिधींनी याबाबत विधिमंडळात आवाज उठविला. त्यामुळे शासनाने सर्वच बाधित शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनाने 17 मार्च 2018  रोजी नवीन अध्यादेश जारी केला आहे. या आदेशामुळे जिल्हाभरातील  1 लाख 97 हजार 342 शेतकर्‍यांना अनुदान मिळणार आहे. कोरडवाहू क्षेत्राला  प्रतिहेक्टर 6 हजार 800 तर बागायती क्षेत्राला 13 हजार 500 रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे.

Tags : ahmadnagar, Cotton grower, Compensation Relief, ahmadnagar news