Wed, Apr 24, 2019 19:49होमपेज › Ahamadnagar › हायमास्ट घोटाळा पंकजांच्या दारी!

हायमास्ट घोटाळा पंकजांच्या दारी!

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 11 2018 1:18AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील हायमास्ट (पथदिवे) दिव्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, चौकशी करण्याबाबत चालढकल करणार्‍या जिल्हा परिषद प्रशासनाकडून आता तरी चौकशी सुरु होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

जिल्हा परिषदेतील हायमास्ट घोटाळा प्रकरण उघडकीस येऊन 20 दिवस होत आले तरीही या प्रकरणाच्या चौकशीला मुहूर्त मिळालेला नाही. या प्रकरणी अनेकांचे हात ‘बरबटलेले’ असल्यानेच अधिकार्‍यांकडून चौकशीबाबत चालढकल होत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात जोर धरत आहे. सत्ताधार्‍यांसह विरोधकही याबाबत ‘चिडीचूप’ असल्याचा आरोप झाल्यानंतर वाकचौरे यांनी पंकजा मुंडेंकडे तक्रार केली. अंदाजे 2 कोटी रुपयांहून अधिक हायमास्ट दिव्यांच्या खरेदीसाठी 16 पेक्षा जास्त ठेकेदारांनी वेगवेगळ्या दुकानांच्या नावावर निविदा भरल्या आहेत. ठराविक 4 ते 5 ठेकेदारांच्या फायद्यासाठी एकत्रित निविदा काढण्यात आली नसल्याचा संशय आहे. निविदा पद्धतीचा वापर करून बाजारभावापेक्षा जास्त दराने हायमास्ट दिवे बसविल्याचे पुढे येत आहे.

वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले की, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर व दक्षिण विभागामार्फत रस्ते व मोर्‍यांच्या बांधकामासाठी 1 कोटी रुपये 2017-18 मध्ये तरतूद होती. त्यात नव्याने वाढीव तरतूद नंतर करण्यात आली. या दोन्ही विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरून पथदिव्यांची खरेदी केली. यात उत्तर विभागाने 199 तर दक्षिण विभागाने 215 दिवे खरेदी केले. तसेच जिल्हा परिषदने 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतील व्याजातून उत्तर विभागाने 27 लाख 15 हजार व दक्षिण विभागाने 40 लाख 85 हजार अशा एकूण 68 लाख रुपयांच्या रकमेचे पथदिवे खरेदी केले. यामध्ये ई निविदा पद्धत राबविण्याची गरज असतांना पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या मर्जीतील एजन्सीला दरपत्रकाद्वारे नियमबाह्य कामे दिली.

या दोन्ही लेखाशिर्षातून नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आलेल्या पथदिव्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. ई निविदा मागविल्या असत्या तर जिल्हा परिषदेचा फायदा झाला असता. दरपत्रकाने खरेदी करून जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत झालेला चिक्की घोटाळा राज्यभर गाजला होता. या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांचेही नाव आले होते. नगरमध्ये उघडकीस आलेला चिक्की घोटाळा राज्यभर गाजला. त्यानंतर आता हायमास्ट घोटाळा उघडकीस येत असून, त्याची चौकशीही सुरु झालेली नाही. या घोटाळ्याची तक्रार झाल्यानंतर आता पंकजा मुंडे चौकशीबाबत आदेश देणार का? याचीही उत्सुकता आहे.