Sun, Jul 21, 2019 16:18
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › नगरसेवक निधीतही घोटाळ्याचा संशय!

नगरसेवक निधीतही घोटाळ्याचा संशय!

Published On: Jan 12 2018 1:50AM | Last Updated: Jan 11 2018 11:08PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

बजेटमध्ये तरतूद न करताच पथदिव्यांच्या कामांची 40 लाखांची देयके अदा करण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आलेला असतांनाच आणि चौकशी समितीने यावर शिक्कामोर्तब केलेले असतांनाच नगरसेवकांच्या प्रभाग स्वेच्छा व वॉर्ड विकास निधीतही अनेक घोटाळे झाल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. नगरसेवकाने पत्र दिलेले नसतांनाही परस्पर कामे प्रस्तावित होऊन त्याची तरतूद करण्यात आल्याचा ‘प्रताप’ उघडकीस आल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.

विकासभार व रेखांकन सुधारणा लेखाशीर्षातून 19 कामांची देयके अदा झाल्याचे व ती कामे बजेट रजिस्टरला खतविण्यात आलेली नसल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले. या प्रकरणामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात बदनामी होऊन नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. कामे न करताच देयके अदा होण्याचे प्रकार यापूर्वीही मनपात उघड झालेले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पथदिवे घोटाळ्यामुळे प्रशासकीय कारभार व कामकाज संशयाच्या भोवर्‍यात सापडल्यानंतर नगरसेवक निधीतूनही असाच एक प्रकार मागील महिन्यात उघडकीस आल्याचे बोलले जात आहे. एका नगरसेविकेच्या वॉर्ड विकास निधीतून विद्युत विभागाशी निगडीत असलेले एक काम प्रस्तावित करण्यात आले होते. संबंधित नगरसेविकेला याची माहिती मिळाल्यानंतर अशा कोणत्याही कामासाठी पत्र दिलेले नसल्याचे त्यांनी संबंधित लिपिकाच्या निदर्शनास आणून दिले. मागील महिन्यात एका लिपिकाची बदली झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर नगरसेविकेने पत्र देवून सदरचे काम रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले. या प्रकाराची चर्चाही सध्या दबक्या आवाजात सुरु आहे.

पथदिवे घोटाळ्यात बजेट रजिस्टरचा मुद्दा ऐरणीवर आला असला तरी नगरसेवकांच्या निधीचे रजिस्टर बांधकाम विभागातच असते. तेथील कर्मचार्‍यांपेक्षा ठेकेदारांकडूनच या रजिस्टरची सर्रास हाताळणी होते. एका नगरसेविकेच्या बाबतीतला प्रकार उघडकीस आला असला तरी अनेक नगरसेवक व नगरसेविका महापालिकेच्या प्रशासकीय कामाबाबत अनभिज्ञ आहेत. पथदिवे घोटाळा आणि एका नगरसेविकेच्या निधीबाबतचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे इतर नगरसेवकांच्या बाबतीतही असेच काहीसे प्रकार घडलेले असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवडाभरात काही नगरसेवकांनी स्वतःच्या निधीचे रजिस्टर तपासून आपल्या निधीबाबत काही गैरप्रकार तर घडले नाहीत ना? याची खात्री केली असल्याचे सांगण्यात येत आहे.