Mon, Jun 24, 2019 16:57होमपेज › Ahamadnagar › आंतरजिल्हा बदल्यांवरून वाद?

आंतरजिल्हा बदल्यांवरून वाद?

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:46AM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

बाहेरच्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने नगर जिल्ह्यात आलेल्या 23 शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी समुपदेशनातून नियुक्त्या दिल्या. मात्र नियुक्त्या देतांना शासन निर्णयानुसार पती-पत्नी एकत्रीकरण न केल्याने बदल्यांवरून पुन्हा एकदा वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. माने यांनी  केलेल्या बदल्या चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत शिक्षकांनी बदली आदेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली अनेक वर्षे बाहेरच्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरीला असलेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी शासनाने दिली. शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या वेळेसच आंतरजिल्हा पद्धतीने बदल्या झाल्या. बाहेरच्या जिल्ह्यातून ह्या शिक्षकांना नगर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले मात्र, जवळपास  पाच महिने ह्या शिक्षकांना शाळांवर नियक्त्याच दिलेल्या नव्हत्या.जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पुढे ढकलल्याने आंतरजिल्हा पद्धतीने बदलून आलेल्या शिक्षकांना नेमणूक देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. 

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी बदल्या न दिलेल्या 23 शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देण्यासाठी बोलाविले होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे हेही उपस्थित होते. सर्व शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर माने यांनी शिक्षकांना नियुक्तीचे ठिकाण सांगत नियक्त्या देत असल्याचे स्पष्ट केले. मात्र संवर्ग 2 नुसार पती-पत्नी एकत्रीकरणाच्या शासन निर्णयाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरात शाळांवर नियुक्ती देण्याची विनंती या शिक्षकांनी केली. परंतु इतर तालुक्यात जास्त जागा रिक्त असल्याने त्या ठिकाणीच नियुक्त्या देण्यात येत असल्याचे सांगत माने यांनी नियुक्त्यांच्या ठिकाणात बदल करण्यास नकार दिला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी दिलेल्या नियुक्त्या ह्या चुकीच्या पद्धतीने दिल्या आहेत. समुपदेशनात शिक्षकांनी ज्या तालुक्यात नियुक्ती मागितली त्या तालुक्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असतांनाही दूरच्या तालुक्यात नियुक्त्या देण्यात आल्या. अकोल्यात पत्नीची नियुक्ती असलेल्या शिक्षकास कोपरगाव, पारनेर मध्ये पत्नीची नियुक्ती असलेल्या शिक्षकास जामखेडला नियुक्ती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ह्या प्रकारचा फेरविचार करावा. नियुक्त्यांमध्ये अंशतः बदल करून पती-पत्नी एकत्रीकरण करावे, अशी आमची मागणी असल्याचे शिक्षकांनी पुढारीशी बोलतांना सांगितले. तसेच याप्रकरणी जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांची भेट घेत अन्यायाला वाचा फोडणार असल्याचेही ते म्हणाले.