होमपेज › Ahamadnagar › आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू

आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 11 2018 1:18AMनेवासा : प्रतिनिधी

नेवासा येथे सकल मराठा,धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी सलग पाच दिवस ठिय्या आंदोलन झाल्यानंतर शुक्रवार (दि.10) ऑगस्टपासून साखळी पद्धतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या साखळी उपोषण आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते भाऊसाहेब वाघ, अनिल ताके, दीपक धनगे, संभाजी माळवदे, युसूफ बागवान, बाळासाहेब कोकणे, पोपट जिरे, बाळासाहेब मारकळी, जितेंद्र महाले हे करीत आहे. या अगोदर पाच दिवसाच्या ठिय्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता समाजात जागृती करण्याच्या दृष्टीने श्री खोलेश्वर गणेश मंदिर चौकात साखळी उपोषण करण्यात सुरू करण्यात आले. या साखळी उपोषणात सर्व गावातील नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपोषण नेतृत्व करणारे भाऊसाहेब वाघ यांनी सांगितले.

रविवार दि.5 ऑगस्टपासून नेवासा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणेश मंदिर चौकामध्ये सकल मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. गुरुवारी दि.9 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. या दिवशी महाराष्ट्र बंदला नेवासा शहरासह तालुक्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलन प्रसंगी सलग पाच दिवस नेवासा तालुक्यातील विविध पक्ष संघटना, शेतकरी, शेतमजूर सर्व जातीधर्माच्या लोकांनी भेट देऊन ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

या साखळी उपोषणात नेवासा तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. या साखळी उपोषणामुळे आता आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनाला अधिक पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शुक्रवारपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू झाले असून या उपोषणाला सर्वांनी येथे येऊन पाठींबा द्यावाअसे आवाहन उपोषणकर्ते भाऊसाहेब वाघ,अनिल ताके,संभाजी माळवदे,दीपक धनगे, बाळासाहेब कोकणे,अभिजित मापारी,शिवसेनेचे नेते अंबादास लष्करे,मुसा बागवान यांनी केले आहे.

अनेकांनी दिला पाठिंबा

मराठा,धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला नेवासा तालुक्यातील विविध संस्था, संघटनेच्यावतीने पदाधिकारी येथे येऊन पाठिंबा देत आहे. सह्यांसाठी स्वाक्षरी मोहिमेला देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.