Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Ahamadnagar › कोपरगावातून नागरिकांचे स्थलांतर सुरू

कोपरगावातून नागरिकांचे स्थलांतर सुरू

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:34AM

बुकमार्क करा
कोरपगाव : प्रतिनिधी

शहरातील रस्ते, पाणी, साफसफाई, स्वच्छता या प्रश्‍नांची सोडवणूक कधीच होणार नाही. याप्रश्‍नी  नगरपरिषदेत केवळ राजकारणाचाच खेळ करण्यात मश्गुल असलेल्या राजकारणी लोकांनी  समस्या न सोडविण्याची खुणगाठ मनाशी बांधली असल्याने अनेक समस्याग्रस्त  नागरिक कोपरगाव सोडून दुसर्‍या शहरात स्थलांतरीत  होत आहेत. 

शहरात विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या असताना प्रत्येक प्रश्‍नी राजकारण केले जात असल्यामुळे पालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या किरकोळ समस्यांची जरी सोडवणूक झाली तरी त्याचे श्रेय संबंधित स्वतः घेऊन मी कशी समस्या सोडवली याचा दिखावा सोशल मीडियावर टाकीत आहे.  रस्त्यावरील किरकोळ खड्डा जरी बुजवला तसेच पाणी प्रश्‍नी एखादी दुरुस्ती झाली तरी सर्व राजकीय पक्ष जनतेवर उपकाराचीच भाषा करताना दिसत आहेत. या श्रेयावादामुळे व भांडणामुळे  शहराचा विकासच नेमका हरवला असल्याची टीका सर्व सामान्य नागरिक, महिला व व्यापारी बोलताना करीत आहे. काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर इतर नगरपालिकांमध्ये एकमत होताना दिसून येते. मात्र कोपरगाव नगरपरिषद त्यालाही अपवाद ठरू पाहत आहे. 

शहरातील रस्त्यांच्या प्रश्‍न तर कोण सोडविणार याचे उत्तर आजवर तरी मिळलेले नाही. पावसाळ्यात अनेक प्रभागांत नागरिकांनी मोठ्या हालअपेष्टा सोसल्या. त्यावरही  केवळ राजकारण करून पहाणी व आश्वासनांची खैरात नेहमीप्रमाणे नागरिकांच्या माथी मारले गेले. पावसाळ्यानंतर चांगले व उच्च दर्जाचे रस्ते होतील असे पालिका प्रशासनाच्यावतीने अनेकदा जाहीर करण्यात आले होते. कामे मात्र शून्य आहेत. पावसाळा होऊन आता थंडी संपायला आली तरी कुठल्याही रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झालेला नाही. त्या प्रश्‍नी एखादी सामाजिक संघटना अथवा नागरिकांचाही उठाव होत नाही. नागरिक थेट पुढील पावसाळ्यातच बोलतील अशी अपेक्षा सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत  आहे. 

पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्याने सर्वच धरणे काठोकाठ भरल्याने जिल्ह्यात कोठेही पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. परंतु कोपरगाव मात्र यास अपवाद ठरले आहे. आजही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाच, सहा दिवसाआड होत आहे. साठवण तळ्याच्या प्रश्‍नी निव्वळ राजकारण केले जाते. चार व पाच नंबरचे तळे होणार हे ऐकण्यातच एक पिढी संपते की काय? अशी अवस्था आहे. याप्रश्नी कुठल्याच राजकीय पक्षाची ठाम भूमिका दिसून येत नाही. शहरातून अचानक नागरिकांना केवळ पाणी किती दिवसाआड होणार याचा भोंगाच ऐकावयास येतो. याप्रश्‍नी सर्वांचीच ‘आळीमिळी गुपचिळी’ दिसून येते.  नगरपालिकेच्यावतीने देण्यात येणार पाणी अक्षरशः गटारीचे मिळत असल्याने त्यामुळे  फिल्टर पिण्याचे पाणी विकत घेणे नागरिकांच्या अंगवळणीच पडले आहे. महिन्याच्या खर्चाच्या बजेटमध्ये त्यांनी पाण्याचे जारचा खर्चही धरल्यातच जमा आहे. 

राहिला प्रश्‍न शहरातील कचर्‍याचा व साफ सफाईचा. त्याचा ठेकेदार कधीच टिकत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कचर्‍याची घाण तशीच साचून राहते. काही ठेकेदार नगरपालिकेला लाखो रुपयांचा चुना लावून पळून गेले. नंतर त्याची चौकशी व वसुलीचे सोपस्कार पार पाडण्यात पाच वर्षे निघून जातात. तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे वैतागलेले नागरिक शहर सोडण्याच्या मार्गावर आहे. 

मुख्याधिकार्‍यांचेही शहराकडे दुर्लक्ष

पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी शासनाचा हजारो रुपयांचा पगार घेतात. आलेल्या नागरिकांना उद्धटपणे उत्तरे तर देतातच, समस्या सोडविणे तर दूरच राहते. आज शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे पालिकेला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले असल्याचा डंका पिटवला जातो. त्यामुळे शहवासियांच्या समस्यांची दुर्दश कधी संपणार? असा सवाल केला जात आहे.