Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी संपर्क अभियान

मराठा आरक्षणासाठी संपर्क अभियान

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:05PMनगर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी 2 मे रोजी होणार्‍या जनसुनावणीत मागासवर्ग आयोगासमोर मोठ्या संख्येने अभ्यासपूर्ण निवेदने सादर केली जाणार आहेत. त्यासाठी गावोगावी व्यापक संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.सर्जेराव निमसे, बालसराफ, डॉराजेश करपे यांच्या उपस्थितीत 2 मे रोजी नगरला मराठा आरक्षणाबाबत जनसुनावणी होणार आहे. यासाठी काल (दि.26) येथील शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. मराठा समाज आरक्षणास कसा पात्र आहे, याबाबतचे संदर्भ, पुरावे व अभ्यासपूर्ण निवेदने कशी असावीत, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रास्ताविक संजीव भोर यांनी केले. या बैठकीत प्रा.तांबे यांनी आरक्षणाची सद्यस्थिती व भविष्यातील दिशा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.यावेळी विठ्ठलराव गुंजाळ,राजेंद्र सावंत,राजेंद्र काळे, मंगेश आजबे, संजय वाघमारे, रामदास बर्डे, सुरेश इथापे, किरण काळे, संदीप कडलग आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात समाजातील व्यक्तींनी वैयक्तिक, तसेच संस्था-संघटना, समूह, ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात निवेदने देण्यासाठी तालुक्यांमध्ये गावोगावी मराठा क्रांती मोर्चा, तसेच मराठा संघटनांच्या वतीने व्यापक व जलद संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ग्रामसभांचे ठराव मोठ्या प्रमाणात सादर करण्यात येणार आहेत. मराठा आरक्षणासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे, अशी मागणी असेल, असेही बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आले. मराठा व कुणबी एकच असल्याचे जास्तीत जास्त पुरावे सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यातील संपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बारा तोटी कारंजा येथील मराठा मंगल कार्यालय येथे पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे.