Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Ahamadnagar › ‘राष्ट्रवादी’च्या बदनामीचे षड्यंत्र!

‘राष्ट्रवादी’च्या बदनामीचे षड्यंत्र!

Published On: Apr 10 2018 1:17AM | Last Updated: Apr 10 2018 12:38AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘राष्ट्रवादी’च्या बदनामीचे षड्यंत्र शिवसेनेने रचले आहे, असा आरोप करत, आमदारांवरील सर्व आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील फेटाळले आहेत.

राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले की, ज्या आरोपीने हे कृत्य केले आहे, त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही़  तो पक्षाचा सदस्य नाही. या घटनेच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस ठाण्यात बोलावले असता तेथे तरुणांची मोठी गर्दी झाली होती. तेथे तोडफोडीचा जो प्रकार घडला तो चुकीचाच आहे. कायदा हातात घेणार्‍यांचे समर्थन करताच येत नाही. मात्र, हा प्रकार कुणी घडवून आणला का? याचीही तपासणी व्हायला हवी. पोलिसांनी तसे न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर सरसकट गुन्हे दाखल केले आहेत.

केडगाव हत्याकांडात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे. संग्राम जगताप यांच्या लोकप्रियतेची धास्ती त्यांनी घेतली आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांना असे खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेने आरोप सिद्ध करावेत अन्यथा कारवाईला तयार रहावे, असा इशारा देत या प्रकरणी अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदी नेत्यांसह आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही वळसे यांनी सांगितले. हत्यांकाडांनतर केडगाव येथे झालेल्या दगडफेकप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा सवालही त्यांनी केला.यावेळी आ. राहूल जगताप, आ. वैभव पिचड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माणिकराव विधाते, सुजित झावरे आदी उपस्थित होते.

कळमकरांवर गुन्हा कसा नोंदविला?

पोलिसांनी आ. संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते़  त्यावेळी तेथे तोडफोड झाल्यावर एका पोलिसाच्या फिर्यादीवरुन निरापराधांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाभाऊ कळमकर यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे ते पोलिस ठाण्यात गेलेही नव्हते. तरीही त्यांचेही  नाव या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे, असा दावा दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, NCP, Conspiracy defame, Dilip Walse Patil,