Thu, Apr 25, 2019 18:28होमपेज › Ahamadnagar › गुन्ह्याचे कनेक्शन प्रांताधिकारी कार्यालयात!

गुन्ह्याचे कनेक्शन प्रांताधिकारी कार्यालयात!

Published On: Aug 11 2018 1:18AM | Last Updated: Aug 10 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

लिपिक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसविल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पांडुरंग कळमकर हा फसवणुकीची रक्कम प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार व एका मंडलाधिकार्‍याकडे दिली, असे पोलिसांना सांगत आहे. तसेच मुलाखतीचा बनाव करून प्रांत कार्यालयात एका रजिस्टरवर उमेदवारांच्या सह्या घेतल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. यातून गुन्ह्याचे कनेक्शन प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. 

पैसे घेऊन युवकांना प्रांताधिकार्‍यांच्या शिक्का व सहीची बनावट नियुक्तीपत्रे दिल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पांडुरंग नारायण कळमकर (रा. खातगाव टाकळी, ता. नगर) याच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. 10) संपत होती. त्यामुळे आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रेवती देशपांडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व सरकारी वकील श्रीमती इथापे यांनी आरोपीची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘या गुन्ह्यात सुरुवातीला 21 जणांना फसविल्याचे उघड झाले होते. तपासात आणखी 14 जणांना फसविल्याचे उघड झाले आहे.

बेरोजगार युवकांकडून घेतलेली रक्कम आरोपी कळमकर हा प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार व एका मंडलाधिकार्‍याकडे दिल्याचे सांगत आहे. ती कोणासमोर व कोठे दिली, याची चौकशी करायची आहे. आरोपीने बेरोजगार युवकांकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडून कोरे धनादेश घेतले आहेत. आरोपीने फसविलेल्या उमेदवारांना दिलेली नियुक्तीपत्रे कोठे टाईप करून घेतली, उपविभागीय अधिकार्‍यांच्या नावाचा शिक्का कोठून उपलब्ध करून घेतला, याची चौकशी करायची आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात एका रजिस्टरवर बेरोजगारांच्या सह्या व आधारकार्ड नंबर घेतला आहे. ते रजिस्टर हस्तगत करणे आहे, गुन्ह्याची पद्धत पाहता या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी.’

आरोपीच्या वकिलांनी पोलिस कोठडीत वाढ करू नये, अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी पांडुरंग कळमकर याला 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 35 बेरोजगारांची सुमारे 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.